या महिन्यात तब्बल 10 दिवस बंद असणार बँका


नवी दिल्ली : रक्षाबंधन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी यासारखे अनेक महत्त्वाचे सण यंदा ऑगस्ट महिन्यात आले असल्यामुळे तब्बल 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस ऑगस्ट महिन्यात बँका बंद राहणार आहे. त्यामुळे बँकांची ऑगस्ट महिन्यात कामे रखडणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतेच या महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, देशातील बँका ऑगस्ट महिन्यात तब्बल 10 दिवस बंद राहणार आहेत. आरबीआयने कोणत्या राज्यात किती दिवस बँका बंद राहणार आहेत याची माहिती या यादीत दिली आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात जवळपास 8 दिवस देशातील अनेक बँका बंद राहणार आहे. https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या लिंकवर बँकाच्या सुट्ट्यांची माहिती देण्यात आली आहे.

यात 12 ऑगस्ट – बकरी ईद, 15 ऑगस्ट -स्वातंत्र्य दिन या दोन दिवस देशातील सर्वच बँकांना अधिकृतरित्या सुट्टी आहे. त्याशिवाय ऑगस्ट महिन्यात 4, 11,18 आणि 25 या दिवशी रविवार आहे. या चारही दिवशी नेहमीप्रमाणे बँकांना सुट्टी असल्याने बँका बंद राहतील. या व्यतिरिक्त 10 आणि 24 ऑगस्टला दुसरा आणि चौथा शनिवार आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशी बँका बंद राहणार आहे. यानुसार 8 दिवस देशातील सर्वच बँकांना सुट्टी असणार आहे.

याशिवाय 17 ऑगस्टला पारसी नूतनवर्ष असल्याने मुंबईत बँकेतील काम बंद राहतील. तसेच मंगळवारी 20 ऑगस्टला श्री श्री माधव देव तिथी असल्याने आसाममध्ये बँका बंद राहतील. तर दुसरीकडे उद्या 3 ऑगस्टला हरियाली तीज हा सण साजरा होणार आहे. हा सण प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, चंदीगढ या ठिकाणी साजरा करण्यात येतो. त्यामुळे या राज्यातील बँका बंद राहणार आहेत.

तसेच दुसरीकडे 23 ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती असल्याने राज्यात अनेक ठिकाणी बँका बंद राहणार आहे. त्याशिवाय 31 ऑगस्टला गुरु ग्रंथ साहिबा जी यांचा प्रकाश उत्सव आहे. हा उत्सव पंजाब आणि हरियाणा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे या राज्यात 31 ऑगस्टला बँका बंद राहणार आहेत.

Leave a Comment