
मुंबई – भाजपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांची भरमसाठ भरती होत आहे. पण आता भाजप प्रवेश आता सोशल मीडियावर चेष्टेचा विषय ठरु लागला आहे. भाजपच्या या मेगा भरतीची सोशल मीडियावर जोरदार खिल्ली उडवली जात आहे. सोशल मीडियात या पक्ष प्रवेशावर विनोदांचा तर महापूरच आला आहे. त्याचबरोबर आता पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही शहरांत भाजपमधील या पक्षप्रवेशाची खिल्ली उडवणारे बॅनरही झळकू लागले आहेत. भाजपचा हा पक्षविस्तार आता जनतेच्या पचनी पडणार की, या पक्षविस्ताराचे भाजपलाच अजिर्ण होणार का याबाबतची उत्सुकता आहे.
सोशल मीडियावर उडवली जात आहे भाजपच्या ‘त्या’ पोस्टरची खिल्ली
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात असलेल्या शिरोडा बाजारपेठ नाक्यावर भाजपमध्ये केल्या जाणाऱ्या पक्ष प्रवेशाबाबत भाजपची खिल्ली उडवणारे बॅनर झळकत आहे. तसेच, दक्षिण नागपुरातील काही भागातही ‘भाजप प्रवेश देणे आहे’ असे लिहिलेले बॅनर झळकत आहेत.
दरम्यान, भाजपमध्ये होणाऱ्या पक्ष प्रवेशाचीही खिल्ली सोशल मीडियावर उडवण्यात आली आहे. यात गेले दोन तीन दिवस सूर्य दिसेना, भाजपमध्ये गेला वाटते?, आधी कोणतेही बटन दाबले तरी मत भाजपाला जात होते. आता कोणालाही निवडून दिले तरी तो आमदार भाजपमध्ये जातो आहे. #कायकरावेबरे अशा स्वरुपांच्या काही विनोदांचा यात समावेश आहे.
