नेत्रावती नदीच्या बॅकवॉटरमध्ये सापडला व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह


बंगळुरू – कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह आज (बुधवारी) नेत्रावती नदीच्या बॅकवॉटरमध्ये सापडला. नेत्रावती नदी परिसरामधून सिद्धार्थ काल (मंगळवारी) बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह होयगी बझार, मंगळुरु येथे सापडला. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम कृष्णा यांचे व्ही. जी. सिद्धार्थ जावई होते.

व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह आम्हाला सापडला असल्याची माहिती सिद्धार्थ यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. वेगलॉक रुग्णालयात मृतदेह हलविण्यात येणार आहे. पुढील तपास चालू आहे, असे मंगळुरुचे पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी सांगितले.

मंगळुरमधील एका पुलाजवळ व्ही. जी सिद्धार्थ हेगडे बेपत्ता झाले होते. त्यांनतर त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. एनडीआरएफ, कोस्टरार्ड आणि पोलीस पथकांनी शोध मोहिमेत सहभाग घेतला होता. त्यांचा शोध बोटींद्वारेही घेण्यात येत होता. श्वान पथकालाही यावेळी पाचारण करण्यात आले होते.

सकलेशपूरला टोयोटा कारमधून आम्ही बंगळुरुवरून जात होतो. २२० किलोमीटर हे अंतर आहे. पण सिद्धार्थ यांनी प्रवासामध्ये गाडी मंगळुरुकडे घेण्यास सांगितली. नेत्रावती नदीच्या किनारी एका पुलाजवळ गाडी आल्यावर ते गाडीतून खाली उतरले आणि मला पुलाच्या दुसऱ्या बाजूला वाट पाहण्यास सांगितले. त्यांनतर ते बेपत्ता झाले, असे व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या गाडीचे ड्रॉयव्हर बसवराज पाटील यांनी पोलिसांना सांगितले.

त्यांनी या घटनेपुर्वी सीसीडीच्या संचालक मंडळाला पत्र लिहल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी यामध्ये उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी त्रास देत असल्याचे म्हटले आहे. तसेच व्यवसायात नफा होत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसेच व्यवसायातील एका भागीदाराकडून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Comment