कॅनडाच्या मैदानात घोंगावत आहे युवराज नावाचे वादळ


आयपीएल मागोमाग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून टीम इंडियाचा सिक्सर किंग याने निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्याने देशांतर्गत टी 20 स्पर्धेत आणि इतर टी 20 लीगमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार युवराज सध्या जीटी 20 कॅनडा या टी 20 स्पर्धेत खेळत आहे. त्याला या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात फारसे यश मिळाले नाही. पण त्याला आता सूर गवसला असून नुकतीच त्याने दमदार 45 धावांची खेळी केली.

तो जीटी 20 कॅनडा या स्पर्धेत टोरँटो नॅशनल्स या संघाकडून खेळत आहे. या संघाचा तो कर्णधार आहे. सोमवारी या स्पर्धेत टोरँटो नॅशनल्सचा विनीपेग हॉक्स या संघाविरुद्ध सामना रंगला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या युवराजने दमदार खेळी केली. कॅनडाचा फलंदाज रोड्रिगो थॉमस याच्यासोबत त्याने 77 धावांची भागीदारी केली. 26 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार यांच्या सहाय्याने युवराजने 45 धावा केल्या. युवराजने फलंदाजी करताना गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला. 173 पेक्षाही अधिकच्या स्ट्राईक रेटने त्याने धावा ठोकल्या. याशिवाय युवराजने सामन्यात 2 षटके टाकत ड्वेन ब्रावोला तंबूत धाडले.

अष्टपैलू खेळ करूनही युवराजच्या संघाला विजय मिळवता आला नाही. युवराजच्या टोरँटो नॅशनल्स संघाने 20 षटकात 216 धावा केल्या. युवराजव्यतिरिक्त सलामीवीर रोड्रिगो थॉमस (65) आणि कायरन पोलार्ड (52) यांनी दमदार खेळी केली. हे आव्हान विनीपेग हॉक्स संघाने शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले आणि सामना आपल्या नावावर केला. विनीपेग हॉक्स संघाकडून क्रिस लिन (89) आणि सनी सोहेल (58) यांनी आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Leave a Comment