विराट कोहलीमुळे गावसकर-मांजरेकर यांच्यात दुरावा


नवी दिल्ली – ३ ऑगस्टपासून टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी २० मालिकेने होणार असून रविवारी या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. भारतीय संघात निर्धारित षटकांसाठी वेगळा आणि कसोटी क्रिकेटसाठी वेगळा कर्णधार अशी पद्धत येणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष होते, पण विराट कोहली याच्याकडेच तीनही प्रकारांमध्ये टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धूरा सोपावण्यात आली. या गोष्टीवर नाराजी व्यक्त करत विराटकडेच कर्णधारपद कायम कसे हा प्रश्न माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी उपस्थित केला होता. माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी त्याच्यावर उत्तर दिले आहे.


वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विराट कोहलीकडे कर्णधारपद देण्याच्या निर्णयावर माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी टीका केली. विराट कोहलीची कर्णधारपदी नियुक्ती करण्याआधी कोणतीही चर्चा निवड समितीने केली होती का? असा सवाल गावसकरांनी विचारला. त्यांनी आपले विचार मिड डे या इंग्रजी वृत्तपत्रात लिहलेल्या स्तंभात मांडले. निवड समितीने आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघ निवडायच्या आधी, कर्णधारपदासाठी बैठक बोलावणे गरजेचे होते. माझ्या माहितीनुसार, विराट कोहलीकडे कर्णधारपद विश्वचषकापर्यंतच होते. विराटकडून ज्या अपेक्षा विश्वचषकात केल्या जात होत्या, त्याची कामगिरी त्याप्रमाणे झालेली नाही. खराब कामगिरीचे कारण देत संघातील काही खेळाडूंना जागा नाकारण्यात आली, मग विराटने त्याच्याकडून होत असलेल्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे का? असे आपले परखड मत गावसकरांनी मांडले.

पण गावसकर यांचे मत माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांना पटलेले नाही. मी सुनील गावसकर यांचा मान राखून सांगतो की विराटचे कर्णधारपद आणि भारतीय निवड समितीबाबत त्यांनी मांडलेले मत मला पटलेले नाही. अत्यंत उत्तम प्रकारे निवड समिती कार्य करत आहे. विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विश्वचषकात खूप चांगली कामगिरी केली. भारताने विश्वचषकातील ७ सामने जिंकले, तर २ सामने गमावले. त्यातीलही १ सामना अत्यंत कमी फरकाने गमवावा लागला, अशा शब्दात मांजरेकर यांनी विराटला पाठिंबा दर्शवला आहे.

Leave a Comment