राष्ट्रवादीतील गळती – गुरुची विद्या गुरुला!


लागोपाठ दोन लोकसभा आणि एका विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव स्वीकाराव्या लागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या मोठी गळती लागली आहे. येणारा प्रत्येक दिवस कोणा ना कोणा नेत्याने पक्ष सोडण्याच्या बातमीसह उगवतो किंवा माळवतो. त्यामुळे नेत्यांची ही गळती थांबावी यासाठी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गेल्या शुक्रवारी होमहवन केले, प्रभू श्रीरामाला साकडे घातले. यावेळी पुरोहितांच्या उपस्थितीत सर्व विधि शास्त्राप्रमाणे करण्यात आले. पुरोगामीपणाचा टेंभा मिरविणाऱ्या राष्ट्रवादीसाठी हे एक आक्रीतच होते. याबाबतची छायाचित्रे आणि बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या, सोशल मीडियात गाजल्या.

तब्बल 15 वर्षे महाराष्ट्रात आणि 10 वर्षे केंद्रात सत्ता गाजवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची ही अवस्था पाहून कोणालाही कीव येईल. गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी पक्षाला रामराम करून भाजप किंवा शिवसेनेचा घरोबा केला. रणजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये तर सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षाचे नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक, नगर जिल्ह्यातील आमदार वैभव पिचड आणि मुंबईतील चित्रा वाघ याही त्याच मार्गावर असल्याचे आता अधिकृतरीत्या जाहीर झाले आहे. नाशिकचे छगन भुजबळ आणि मराठवाड्यातील भोकरचे बापूसाहेब गोरठेकर यांच्या बाबत हीच शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याबाबत सोशल मीडियावर तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेष्टेला ऊत आला असून पक्षाची प्रचंड खिल्ली उडवली जात आहे. ‘हे असेच चालू राहिल्यास राष्ट्रवादीत केवळ शरद पवार आणि सुप्रिया सुळेच उरतील’ अशा स्वरूपाचे विनोद फिरत आहेत. अनेक ठिकाणी विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखतींकडेही नेत्यांनी पाठ फिरविल्याची चर्चा आहे.

खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाही या गळतीची दखल घ्यावी लागली. “राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांमागे भाजप लागला आहे. आमचे नेते खेचण्यासाठी सर्व मार्गांनी प्रयत्न केले जात आहेत. सरकारकडून ईडी, सीबीआय यांचा गैरवापर लोकप्रतिनिधींना धमकावण्यासाठी केला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर वाढले असून पक्षांतर करण्यासाठी नेत्यांवर दबाव आणला जात आहे,” असे पवार म्हणाले.

त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांवर उलट तोफ डागली. “पवारांच्या पक्षात लोक राहायला का तयार नाहीत याचे आत्मचिंतन त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने केले पाहिजे,” असे ते म्हणाले. दुसरीकडे, भाजप महायुती सरकारने गेल्या पाच वर्षांत राज्यात केलेल्या विकासकामांमुळे जनतेमध्ये भाजपाविषयी प्रचंड विश्वास निर्माण झाला असून त्यामुळेच अन्य पक्षांतील अनेक नेते व कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.

राष्ट्रवादीच नव्हे तर काँग्रेसमधूनही भाजपमध्ये आयारामांची संख्या प्रचंड वाढली आहे, यात शंका नाही. बाहेरच्यांची ही आवक बघून खुद्द भाजपातील मंडळीही थक्क झाली आहेत तर भाजपच्या अस्सल समर्थकांमध्येही चलबिचल होत आहे. त्यावरूनही अनेक तिरकस व औपरोधिक विनोद फिरत आहेत. मात्र या सर्वात मुख्यमंत्री फडणवीस शांत आहेत. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी नेते म्हणून ते आज पुढे आले आहेत. त्यांचा सामना थेट दुसरे प्रभावी नेते शरद पवार यांच्याशी आहे आणि पवारांच्याच मार्गाने ते त्यांना धोबीपछाड देत आहेत.

भाजपाने पक्ष फोडण्याची हद्द गाठली आहे, हे खरे. मात्र महाराष्ट्रात ही पक्ष फोडण्याची परंपरा सुरू कोणी केली? ज्यावेळी आयाराम-गयाराम हे शब्दही भारतीय राजकारणात रूढ नव्हते तेव्हा पवारांनी काँग्रेस पक्ष फोडून वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले होते. त्यावेळी रूढ झालेला पवारांनी पाठीत सुरा खुपसला हा वाक्प्रचार आजही लोकांच्या आठवणीतून गेलेला नाही. त्यानंतरही इतर पक्षातील लोकांना ओढण्यासाठीची पवारांची ख्याती होतीच.

आज ज्यांच्या पक्ष सोडण्याची चर्चा आहे ते छगन भुजबळ आणि गणेश नाईक हे काय राष्ट्रवादीने तळागाळातून आणलेले नेते आहेत का? राष्ट्रवादीची मुलुखमैदानी तोफ म्हणून ज्यांचे नाव आहे त्या धनंजय मुंडे यांना पवारांनी कुठून आणले? ते जाऊ द्या, संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच एक प्रकारे फोडाफोडीतून आलेला पक्ष आहे कारण सोनिया गांधींच्या मूळाचा बहाणा करून पवारांनी काँग्रेस पक्ष फोडल्यामुळेच तो अस्तित्वात आला आहे.
पवारांनी दाखविलेल्या मार्गानेच आज फडणवीस जात आहेत. पवारांचेच शस्त्र वापरून आपण त्यांना मात देऊ शकतो, हे त्यांना माहीत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत आले असताना पवार हे माझे राजकीय गुरू असल्याचे सांगून गेले. मोदींचे शिष्योत्तम देवेंद्र फडणवीस आज पवारांचीच पद्धती वापरून त्यांना नामोहरम करत आहेत. गुरुची विद्या गुरूला फळते, ती अशी!

Leave a Comment