इन्स्टा स्टार कुत्रा जिफपॉम – कमाई एका पोस्टसाठी १२ लाख


पैसा मिळविणे हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचे ध्येय असते. कुणी नोकरी करून, कुणी व्ययसाय करून तर कुणी अन्य काही उद्योग करून पैसे मिळविण्याच्या प्रयत्नांत असतो. पण हा पैसा मोठा जादुगार आहे. तो कुणाला कधी, किती, कसा मिळेल याचा काहीच अंदाज वर्तविता येत नाही. आता जिफपॉमचेच पहा. जिफपॉम हा पामेरियन जातीचा कुत्रा असून त्याचे इन्स्टाग्राम वर चक्क ९२ लाख फोलोअर आहेत. हा बेटा इन्स्टास्टार आहे आणि एका पोस्टसाठी त्याला १२ लाखांपर्यंत रक्कम मोजली जाते.


अनेक सेलेब्रिटींनी जिफपॉमसोबत त्यांचे फोटो काढले आहेत. जिफपॉम असाच चर्चेत आलेला नाही किंवा त्याला मिळालेली लोकप्रियता केवळ नशिबाने नाही. जिफपॉमच्या नावावर गिनीज रेकॉर्ड आहे. २०१४ मध्ये दोन पायांवर सर्वात वेगाने धावणारा कुत्रा म्हणून त्याने रेकॉर्ड केले आहे. मागच्या दोन पायावर १० मीटरचे अंतर व पुढच्या पायांवर पाच मीटरचे अंतर त्याने सर्वाधिक वेगाने कापले आहे. जिफपॉमला फेव्हरीट इन्स्टाग्राम पेट श्रेणीत किड्स चॉइस अॅवॉर्ड सन्मान मिळाला आहे तसेच २०१७ मध्ये त्याने सर्वाधिक फॉलोअर्स असलेला एकमेव कुत्रा (८४ लाख फॉलोअर्स) हा खिताब मिळविला आहे. आता त्याचे ९२ लाख फॉलोअर्स आहेत.


जिफपॉम पुशअप्स मारतो. ब्रान्डेड कपड्यांसाठी जाहिराती करतो. अमेरिकन सिंगर कॅटीच्या एका गाण्यात त्याने रोल केला आहे तसेच टीव्ही सिरीयल मध्येही त्याने काम केले आहे. त्याच्या स्पॉन्सर पोस्टचा खर्च १७ हजार डॉलर्स म्हणजे १२ लाख रुपये आहे.

Leave a Comment