आता येणार ‘ठाकरे’ चित्रपटाचा सिक्वल येणार!


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. ‘ठाकरे’ चित्रपटाच्या पहिल्या भागाला शिवसैनिकांपासून अनेक चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निर्मितीत ‘ठाकरे’ चित्रपटाचा सिक्वल लवकर तयार करण्यात येणार आहे.

25 जानेवारी 2019 रोजी ‘ठाकरे’ चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. अनेकांनी हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी डोक्यावर घेतला होता. शिवसेना स्थापनेपासून ते राज्यात युतीची सत्ता येण्यापर्यंतच्या प्रमुख घटना या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता लवकरच ठाकरे चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा करण्यात आली आहे. राजकारणात झालेला उदय, त्यानंतर झालेली पक्षातील बंड यासह अनेक प्रमुख घटना या चित्रपटात प्रेक्षकांसमोर आणली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संजय राऊत हे सध्या ‘ठाकरे’ सिक्वल बरोबर दिवंगत माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट ‘जॉर्ज’, तर मुंबई पोलीस दलातील कर्तृत्वान निवृत्त पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्या कामगिरींवर आधारित चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. राऊत इंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून या सर्व चित्रपटांची निर्मिती केली जाणार आहे. तसेच ठाकरे चित्रपटाच्या सिक्वलमध्ये कलाकारांची संपूर्ण वेगळी टीम असणार आहे. ‘ठाकरे’ सिक्वलच्या दिगदर्शनाची धुरा मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या आणि बॉलिवूडमध्ये वावर असलेल्या दिग्ददर्शकाकडे देण्यात येणार आहे. दरम्यान या तिन्ही चित्रपटाच्या निर्मितीसाठी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट टीमशी संपर्क आणि बोलणी सुरू आहेत.

Leave a Comment