
मुंबई – सर्व विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका केली होती. राज ठाकरे यांनी नुकतीच दिल्लीत निवडणूक आयोगाला भेट देत ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली. राज ठाकरे त्यापाठोपाठ आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची ईव्हीएमबाबत भेट घेणार आहेत.
ममता दीदींची भेट घेणार मनसे प्रमुख राज ठाकरे
राज ठाकरे ईव्हीएमविरोधात सर्व विरोधी पक्ष अध्यक्षांची भेट घेणार असल्याचे समजते. राज ठाकरे यांनी नवी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. सीबीआय विरुद्ध बंगाल पोलीस असा संघर्ष पश्चिम बंगालमध्ये सुरू असताना राजीव कुमार यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत राज ठाकरेंनी ममता बनर्जी यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला होता. आता ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन ईव्हीएमविरोधात राज ठाकरे वातावरण तापवणार आहेत.
