राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा राजीनामा


मुंबई – चित्रा वाघ यांनी आपला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला आहे. अध्यक्षपदासह राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही वाघ यांनी राजीनामा दिला असून लवकरच त्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

३० जुलै रोजी चित्रा वाघ या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीतून वाघ यांना फोडून भाजपमध्ये आणण्यासाठी मुख्यमंत्र्याचे अत्यंत जवळचे आमदार म्हणून ओळख असलेल्या प्रसाद लाड यांच्याकडे संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी ती जबाबदारी फत्ते केली असल्याने मोठ्या धुमधडाक्यात वाघ यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


भाजपमध्ये चित्रा वाघ यांचा प्रवेश झाल्यानंतर तातडीने त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. भाजपच्या वरिष्ठांनी त्यांना त्यासाठी ठोस आश्वासन दिले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास महिला आयोगावर नियुक्ती व्हावी, या अटीवर होकार दिला असल्याचेही सांगण्यात येत आहे. प्रसाद लाड आणि चित्रा वाघ एकमेकाला भाऊ-बहीण समजत असून अनेक वर्षांपासूनचे ते एकमेकांचे परिचित आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या भावा-बहिणीचे नाते राजकीय घडामोडीसाठी भाजपला फायद्याचे ठरले असल्याचेही बोलले जात आहे.

गुरुवारी शिवसेनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी प्रवेश केला होता. आता, चित्रा वाघ यांनी राजीनामा दिल्यामुळे पक्षासाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेससह राष्ट्रवादीतील काही नेते शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये काँग्रेस आमदार कालिदास कोलंबकर, जयकुमार शितोळे, सुनील केदारे आणि राष्ट्रवादीचे भास्कर जाधव, अवधूत तटकरे यांचा समावेश आहे.

Leave a Comment