
ब्रिटनचे नवे पंतप्रधान कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे बोरिस जॉन्सन यांनी गुरुवारी पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान १० डाउनिंग स्ट्रीट मध्ये प्रवेश करतानाच एक रेकॉर्ड नोंदविले आहे. गेल्या ५७ वर्षात प्रथमच या निवासस्थानात पत्नीशिवाय कुणी पंतप्रधान राहायला आला आहे. आता बोरिस या ठिकाणी त्यांच्या गर्लफ्रेंड बरोबर राहून दुसरा पराक्रम करणार का अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
१०, डाउनिंग स्ट्रीट मध्ये बोरिस गर्लफ्रेंडसह राहणार काय याची चर्चा सुरु
बोरिस २५ वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर पत्नी मरीना व्हीलरपासून विभक्त होत असून त्यांना चार मुले आहेत. त्याची केस न्यायालयात असून अजून घटस्फोट प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. मात्र बोरिस पंतप्रधान निवासात प्रथम आले तेव्हा ते त्यांची गर्लफ्रेंड कॅरी सायमंड सोबत आले. कॅरी स्टाफसोबत या ठिकाणी आली तेव्हा मिडिया रिपोर्टर तिचे फोटो घेण्यासाठी सरसावले. कॅरी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाची माजी संपर्क प्रमुख म्हणून काम करत होती.
ब्रिटीश परंपरेनुसार नवीन पंतप्रधान जेव्हा प्रथम पंतप्रधान निवासस्थानात येतात तेव्हा पत्नी, मुलांसह सर्व उपस्थितांना अभिवादन करतात. यंदा ही प्रथा मोडली गेली आहे. ब्रिटीश कायदा सांगतो जो पर्यंत बोरिस यांची घटस्फोट प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत ते विवाहित मानले जातील. त्यामुळे अन्य महिलेसोबत त्यांनी १० डाउनिंग स्ट्रीट मध्ये राहणे हा ब्रिटीश नैतिकता आणि गोपनीयता कायद्याचे उल्लंघन ठरेल.
