तापसी पन्नू बदलणार बॉलिवूडने केलेली हिरोची व्याख्या


बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून हिरोलाच सर्वाधिक महत्व दिले जाते आणि नेहमी हिरो हे पुरूषच असतात. पण लवकरात लवकर ही परंपरा नष्ट झाली पाहिजे, अशी इच्छा अभिनेत्री तापसी पन्नूने व्यक्त केली आहे. चित्रपटसृष्टी आणि भारतीय प्रेक्षकांनी जर स्त्रीप्रधान चित्रपटांना मोठ्या मनाने स्वीकारले तर हा बदल निश्चितच लवकरात लवकर होईल, असेही तापसी म्हणाली.

तापसी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की, कोणतेही जेंडर हिरोचे नसते आणि माझ्या चित्रपटांमधून तेच मी सिद्ध करण्याचा प्रयत्न करते आहे. तसेच, एकाच साचेबद्ध पद्धतीचे चित्रपट आणि त्याच पद्धतीचे हिरो आपण गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांना देत आलो आहोत. एका रात्रीत बदल होणार नाही. तर यासाठी पुढाकार आपल्या इंडस्ट्रीमधील अभिनेत्रींनाच घ्यावा लागेल आणि या बदलाचा भागिदार व्हावे लागेल.

समिक्षकांनी तापसीच्या याआधी प्रदर्शित झालेल्या गेम ओव्हर या चित्रपटाला चांगले गुण दिले. पण चांगला प्रतिसाद प्रेक्षकांकडून न मिळाल्यामुळे बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला चांगला व्यवसाय करता आला नाही. तापसीच या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. चित्रटात हिरो किंवा हिरोईन नाही तर चित्रपटाची पटकथाच खरा हिरो असते. तिने यातून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. या चित्रपटाकडून तिला बऱ्याच अपेक्षा होत्या, जेणेकरून बाकीचे निर्मातेही अशा प्रकारच्या चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतील.

Leave a Comment