गुजरातच्या प्रीती पटेल बनल्या ब्रिटनच्या गृहमंत्री


लंडन – भारतीय वंशाच्या महिला खासदार प्रीती पटेल यांची ब्रिटनचे नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळामध्ये गृहमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या ब्रिटनच्या गृहमंत्री बनणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या नागरिक ठरल्या आहेत. प्रीती पटेल या ब्रिटनमधील हुजूर पक्षाच्या नेतृत्वासाठी चालवण्यात आलेल्या ‘बॅक बोरिस’ अभियानातील प्रमुख सदस्य होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे मोठी जबाबदारी नव्या कॅबिनेटमध्ये सोपवण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

दरम्यान, प्रीती पटेल नव्या कार्यभाराविषयी घोषणा होण्यापूर्वी म्हणाल्या होत्या की, आधुनिक ब्रिटन आणि आधुनिक हुजूर पक्षाचे प्रतिबिंब नव्या मंत्रिमंडळात दिसले पाहिजे. भारतीय वंशाच्या लोकांच्या सर्व मुख्य कार्यक्रमांमध्ये मूळच्या गुजराती असलेल्या प्रीती पटेल अतिथी म्हणून उपस्थित असतात. तसेच त्यांना ब्रिटनमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रशंसक म्हणून ओळखले जाते.

प्रीती पटेल यांचे आई-वडील गुजराती होते. आफ्रिका खंडातील युगांडा येथे वास्तव्यास असलेले त्यांचे आई-वडील 60 च्या दशकात इंग्लंडमध्ये गेले होते. 47 वर्षीय प्रीती पटेल सर्वप्रथम 2010 मध्ये विटहॅम मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2015 आणि 2017 मध्येही त्यांनी या मतदारसंघामधून विजय मिळवला होता. याआधी प्रीती पटेल यांनी डेव्हिड कॅमेरून यांच्या सरकारमध्ये रोजगार राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.

Leave a Comment