व्हायरल होत आहे १ लाख ८० हजारांची बाईक असणारा झोमॅटोचा डिलीव्हरी बॉय


सध्याच्या डिजीटल युगात हवी नको ती वस्त आपल्याला ऑनलाईन अॅप्लिकेशनच्या माध्यमातून उपलब्ध होत असते. त्यातच जर का तुम्हाला भूख लागली असेल तर आपण आपला मोबाईल घेतो आणि आपल्याला जे हवे आहे ते मागवतो. सध्या खाद्य बाजारपेठेत झोमॅटो, स्वीगी, उबर इट्स, फूड पांडा यासारखे अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. या अॅप्सचा वापर खास ऑफर्स आणि घर बसल्या घरी पदार्थ आणून देण्याची सोय यामुळे दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे.

डिलीव्हरी बॉयजची मागणी या अॅप्समुळे वाढली असल्यामुळेच डिलीव्हरी बॉय म्हणून अनेक तरुण अशा अॅप्लिकेशन्ससाठी नोकरी करताना दिसत आहे. अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे हे डिलीव्हरी बॉयज चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियात असाच एक डिलीव्हरी बॉय चर्चेत आहे. हरियाणातील कर्नाल येथील सुरज असे या डिलीव्हरी बॉयचे नाव आहे. डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत सुरजने थोडे थोडे पैसे जमवून आपली ड्रीम बाईक घेण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे. सुरजच्या या प्रत्यक्षात अवतरलेल्या स्वप्नाबद्दलची माहिती झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनीच ट्विट करुन दिली आहे.


गोयल यांनी आपल्या ट्विटमध्ये तुम्ही कष्ट केले, काम केले तर तुमचे स्वप्न पुर्ण करणे सहज शक्य आहे, तुम्हाला कोणीही थांबवू शकत नसल्याचे म्हटले आहे. गोयल सुरजने घेतलेल्या केटीएम आरसी २०० या बाईकबद्दल बोलताना आपल्या ट्विटमध्ये लिहितात, सुरज हा आमच्या कर्नाल टीममधील असून तो मागील पाच महिन्यापासून त्याच्या स्वप्नातील बाईक घेण्यासाठी पैसे वाचवत होता. तुम्ही जर त्याला या सुपरकूल बाईकवर पाहिले तर नक्की हात दाखवा. झोमॅटोशी संबंधित अनेकांच्या प्रेरणादायी कथा असल्याचे पुढे त्यांनी म्हटले आहे. झोमॅटो डिलीव्हरी युनिव्हर्समधील अनेक प्रेरणादायी कथांपैकी ही एक आहे. यशाच्या मार्गावर जाण्यासाठी ज्यांनी लक्ष्य केंद्रित केले आहे त्यांच्या कथा आहेत या, असे गोयल म्हणतात.

अनेकांनी सुरजचे गोयल यांच्या या ट्विटवर अभिनंदन केले आहे. तर डिलीव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या सुरजने पाच महिन्यांच्या पगारामध्ये एवढी महाग बाईक कशी काय घेतली असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे. तर काहींनी झोमॅटोच्या डिलीव्हरी बॉयला असा किती पगार आहे असा सवालही गोयल यांनी केला आहे.

Leave a Comment