करण जोहर बनवणार ‘डिअर कॉम्रेड’चा हिंदी रिमेक


दाक्षिणात्य तरुणांमध्ये अभिनेता विजय देवरकोंडाची चांगलीच क्रेझ असून विजयच्या ‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेला ‘कबीर सिंह’ काही दिवसांपूर्वीच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. शाहिद कपूरने ज्यात मुख्य भूमिका साकारली आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.

आता विजय देवरकोंडाच्या आणखी एका चित्रपटाचा हिंदी रिमेक येणार आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून विजय देवरकोंडासोबतचा आपला फोटो करण जोहरने शेअर केला आहे. करणने याला दिलेल्या कॅप्शनमध्ये चित्रपटाच्या रिमेकबद्दलची घोषणा केली आहे. माझ्यासाठी ‘डिअर कॉम्रेड’ चित्रपट पहिल्यांदाच पाहायला मिळणे आनंदाचे होते. ही एक सुंदर आणि प्रखर प्रेमकथा आहे. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदना यांचे अभिनय अतिशय उत्तम असल्याचे करणने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


यासोबतच अनेक अनपेक्षित वळणे चित्रपटात आहेत आणि तुम्हाला हा चित्रपट शेवटी अतिशय महत्त्वाचा आणि गरजेचा संदेश देतो, असे म्हणत दिग्दर्शक भारत कम्मा यांचेही करणने कौतुक केले आहे. यासोबतच या चित्रपटाच्या हिंदी रिमेकची निर्मिती धर्मा प्रोडक्शन करणार असल्याची घोषणा करताना अतिशय आनंद होत असल्याचे करणने म्हटले आहे. या चित्रपटाचे हक्क करणने विकत घेतले आहेत.


येत्या २६ जुलैला दाक्षिणात्य डिअर कॉम्रेड चित्रपटगृहात दाखल होत आहे. हा चित्रपट तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्ल्याळम अशा चार दाक्षिणात्य भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटातून तेलंगणातील विद्यार्थी राजकारणावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. तर या चित्रपटात रश्मिका राज्यस्तरीय क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला होता.

Leave a Comment