
वॉशिंग्टन – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) भारताची अर्थव्यवस्था मंदावलेली असताना चिंतेत भर घालणारा अंदाज वर्तविला आहे. भारताचा विकासदर २०१९ व २०२० मध्ये कमी होईल, असा अंदाज आयएमएफने वर्तविला असून भारताचे राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपी) ०.३ टक्क्याने कमी होईल, असे आयएमएफने या दोन्ही वर्षात पूर्वी वर्तविलेल्या अंदाजाहून अहवालात म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तवला भारताचा विकासदर घटण्याचा अंदाज
२०१९ मध्ये भारताचा जीडीपी ७ टक्के आणि २०२० मध्ये ७. २ टक्के राहिल, असे आयएमएफने अहवालात म्हटले आहे. विकासदर कमी झाला तरी जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा भारत हा मान कायम टिकवेल, असे आयएमएफने म्हटले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग चीनपेक्षा मोठ्या फरकाने पुढे राहिल, असेही आयएमएफने म्हटले आहे.
चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेबरोबरील व्यापारी युद्धानंतर मंदावली आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेवर कमी झालेली मागणी आणि वाढत्या आयात शुल्काने नकारात्मक परिणाम झाला असल्यामुळे वाढत्या कर्जावर नियंत्रण ठेवण्याची चीनला गरज आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी व्यक्त केली. जागतिक विकासदर हा २०१९ मध्ये ३.२ टक्के राहिल, असा अंदाज गोपीनाथ यांनी वर्तविला आहे. तर २०२० मध्ये ३.५ टक्के विकासदर राहिल, असा अंदाज वर्तविला आहे.
