राष्ट्रवादी अमोल कोल्हेंच्या खांद्यावर देणार मोठी जबाबदारी


मुंबई : अभिनेते आणि शिवसेनेत कार्यरत असणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली. डॉ. कोल्हे यांनी या निवडणुकीत विजय मिळवत सर्वांचेच लक्ष वेधून घेतल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून आता अमोल कोल्हे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनेक कार्यक्रमांना गेल्या काही दिवसांपासून अमोल कोल्हे हेदेखील उपस्थित असतात. त्यानंतर अजित पवार यांनी आता पुण्यातील भोसरी येथे बोलताना अमोल कोल्हे यांना राज्यात मोठी जबाबदारी देण्याचे संकेत दिले आहेत. निवडणुकीनंतर अमोल कोल्हे हे भोसरीत येत नाहीत, अशी तक्रार करू नका. दिल्लीत ते चांगले काम करत आहेत. तसेच त्यांना आगामी निवडणुकीतही राज्यातील राष्ट्रवादीच्या इतर मोठ्या नेत्यांप्रमाणे जबाबदारी द्यायची असल्याचे अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

काही दिवसांपूर्वी बारामतीत आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार अमोल कोल्हे यांनी आजारी असतानाही अजित पवारांच्या विनंतीला मान देवून बारामतीतील कार्यक्रमासाठी हजेरी लावली. तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन असले तरी तुम्ही पाच मिनिटे का होईना बारामतीच्या कार्यक्रमाला या, अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यामुळे आजारी असतानाही बारामतीच्या कार्यक्रमाला अमोल कोल्हे यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला होता.

दरम्यान, संसदेत शेती, बैलगाडा शर्यत, गडकिल्ले अशा अनेक विषयांबाबत भाष्य करत शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून गेलेल्या अमोल कोल्हे यांनी सरकारचे लक्ष्य वेधून घेतले होते. त्यांनी यावेळी केलेली विषयांची मांडणी आणि वक्तृत्वशैली यामुळे कोल्हे यांचे कौतुक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभ्यासपूर्ण भाषण केल्याबद्दल काही मोजक्या खासदारांचा उल्लेख केला. त्यात अमोल कोल्हे यांच्या नवाचाही समावेश होता.

Leave a Comment