दिल्लीच्या तीन वेळच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन


नवी दिल्ली – वयाच्या ८१ व्या वर्षी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दीक्षित यांचे निधन झाले आहे. १५ वर्षे शीला दीक्षित यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यांनी दिल्लीतील एक्सॉर्ट रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी १९९८ ते २०१३ या काळात दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. काँग्रेसमधून दीक्षित यांच्या निधनावर शोक व्यक्त होत आहे. काँग्रेसची देशभरात पडझड होत असताना शीला दीक्षित यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या निधनामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

तीन वेळा शीला दीक्षित यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री पद भूषावले आहे. शीला दीक्षित यांना दिल्लीमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाते. शीला दीक्षित यांचा जन्म ३१ मार्च १९३८ रोजी पंजाबमधील कपूरथला येथे झाला होता. दिल्लीमध्ये शीला दीक्षीत यांचे शिक्षण झाले होते. त्यांनी दिल्लीच्या कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून मास्टर्स ऑफ आर्ट्समध्ये पदवी घेतली होती.

१९८४ ते १९८९ पर्यंत शीला दीक्षित या उत्तर प्रदेशमधील कन्नौज लोकसभा मतदारसंघाच्या खासदार होत्या. शीला दीक्षित यांनी १९८६ ते १९८९ या कालावधीत केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली होती. २०१४ मध्ये शीला दीक्षित यांची केरळ राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. पण २५ ऑगस्ट २०१४ मध्ये त्यांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये पूर्णकाळ कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला होता. यंदाच्या लोकसभा निवडुकीत शीला दिक्षीत यांना भाजपाच्या मनोज तिवारीकडून पराभवचा धक्का बसला आहे. १९८४ ते १९८९ या कार्यकाळात शीला दीक्षित यांनी संयुक्त राष्ट्र आयोगात ५ वर्ष भारताचे प्रतिनिधीत्व करून महिलांच्या समस्येकडे संयुक्त राष्ट्राचे लक्ष वेधले होते.

Leave a Comment