सीओएने मागवला टीम इंडियातील खेळाडूंच्या बायको-प्रेयसींच्या खर्चाचा तपशील!


नवी दिल्ली : टीम इंडियाची विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यातील पराभवानंतर खेळाडूंची झाडाझडती सुरु झाली आहे. कोट्यावधी रुपयांची बक्षीसे विजयानंतर देणारी बीसीसीआय, आता पराभवानंतर हिशोब मागत आहे. कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडे बीसीसीआयचे कामकाज पाहणाऱ्या, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या क्रिकेट प्रशासक समितीने (सीओए) खेळाडूंच्या पत्नी आणि प्रेयसींच्या दौऱ्याच्या खर्चाची माहिती मागवली आहे.

केवळ बीसीसीआयचे अधिकारीच नव्हे तर लोढा समितीही सीओएच्या या निर्णयाने आश्चर्यचकीत आहे. आता लोकपाल डी के जैन यांनीच याप्रकरणी निर्णय घ्यावा, असे निवृत्त न्यायमूर्ती आर एम लोढा म्हणाले. क्रिकेटपटूंना विदेश दौऱ्यावर जाताना पत्नी आणि प्रेयसींना सोबत घेऊन जाण्यास आधी बीसीसीआयने नकार दिला होता. पण नंतर काही अटींसह त्यांना परवानगी दिली होती. न्यायमूर्ती लोढांनी त्याचाच दाखला देत म्हणणे मांडले.

आता लोढा समितीच्या प्रस्तावित संविधानाविरुद्ध उचलली जाणारी पावले लोकपालांनी रोखायला हवीत. आपल्यापरीने प्रत्येकजण लोढा समितीच्या शिफारसींचा अर्थ लावत आहे. सूचना आमच्या संविधानाच्या चौकटीत असून त्याविरुद्ध जर पावले उचलली जात असतील, तर लोकपालांनी हस्तक्षेप करायला हवा, असे न्यायमूर्ती लोढा म्हणाले. कर्णधार, प्रशिक्षक तसेच खेळाडूंनी आपल्या पत्नी आणि प्रेयसींना परदेशी दौऱ्यावर घेऊन जाणे हे हितसंबंधांची बाब आहे. पण बीसीसीआयसाठी आपण नवे असे नियम बनवले असल्याचे लोढा म्हणाले.

Leave a Comment