भारतातील फेस अॅप युझर्स करत आहेत अडचणीचा सामना


मुंबई : सध्या फेस अॅपची चांगलीच क्रेझ भारतातील तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे. या अॅपने सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनाच चांगलेच वेड लावले आहे. सर्वजण या अॅपच्या मदतीने स्वत:ला वृद्ध बनवत आहेत. हे अॅप आतापर्यंत लाखो लोकांनी डाऊनलोड करुन आपण म्हातारपणी कसे दिसतो हे बघण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे फेस अॅप वापरताना अनेक भारतीय युझर्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना हे अॅप वापरताना ‘सर्वर उपलब्ध नसल्यामुळे तुम्ही थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा, असा मेसेज दिसत आहे. तर ओल्ड एज फिल्टर काही जणांच्या अॅपमध्ये दिसत नसल्याच्या तक्रारीही अनेकांनी केल्या आहेत. दरम्यान काही तज्ज्ञांनी या अडचणी का येतात याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतात फेस अॅपला अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली आहे. पण भारतातील काही युझर्सना बुधवारपासून अडचणी येत असल्याची तक्रार केली आहे. याबाबतचे स्क्रीनशॉटही काहींनी शेअर करत यामागचे कारणही विचारले आहे. सोशल मीडियावर ट्रेंड होणारे फेस अॅप डाऊनलोड केल्यानंतर अनेकांना Something went wrong असा मेसेज दिसत आहे. तर आयफोन वापरणाऱ्यांना सॅड इमोजीसह The operation couldn’t be completed असा मेसेज दिसत असल्याची तक्रार केली आहे. त्यानंतर हे अॅप काहींनी वीपीएनच्या मदत घेतल्यानंतरच सुरु होत असल्याचे सांगितले आहे.

विशेष म्हणजे हा ERROR फक्त भारतीय युजर्सला दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा ERROR येण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे वर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (वीपीएन) असल्याचे सांगितले जात आहे. युझर्सची ओळख वीपीएनद्वारे लपवली जाते. त्यामुळे अनेकजण सहजतेने आयपी अर्ड्रेस बदलतात. त्यामुळे फेस अॅपचा वापर नेमका कुठून होत आहे, याची माहिती अॅपला मिळत नसल्याने अनेकदा ERROR चा मेसेज येतो.

फक्त भारतीयांना हा मेसेज येत असल्याची तक्रार अनेकांनी केली. तसेच फेस अॅप ने केवळ भारतीयांना ब्लॉक केल्याची चर्चाही रंगू लागल्या आहे . यावर फेस अॅप गोपनियतेबाबत (Privacy policy) काही युजर्सने शंका उपस्थित केली आहे.

दरम्यान अल्पावधीत फेस अॅप प्रसिद्ध झाल्याने बुधवारी अनेकांनी हे अॅप एकाचवेळी डाऊनलोड केले. कदाचित फेस अॅपच्या सर्वरचा परिणाम झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे फेस अॅप वापरताना काही भारतीयांना हे अॅप डाऊनलोड करताना किंवा वापरताना अनेकदा ERROR चा मेसेज येत होता. विशेष म्हणजे याच कारणामुळे फेस अॅपने काही भारतीयांना ब्लॉक केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच हे अॅप इंटरनेटच्या मदतीने काम करते. तरुण चेहरा वृद्ध करण्यासाठी यात एआई फिल्टर वापरावे लागते. मात्र अनेक युझर्सने एकाचवेळी हे अॅप वापरल्यास एआई फिल्टर बंद पडते. भारतात या दोन कारणामुळे या अॅपवर वारंवार ERROR चा मेसेज येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment