
लंडन : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला निलंबित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हा महत्त्वाचा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डावर ही कारवाई लोकशाही पद्धतीने निष्पक्ष निवडणूक न झाल्याने आणि क्रिकेट प्रशासनात राजकारण घुसल्याने करण्यात आली आहे. त्यांना आयसीसीकडून मिळणारी फंडींग आता झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाचे निलंबन झाल्यामुळे थांबेल. तसेच आयसीसीच्या कोणत्याही कार्यक्रमात झिम्बाब्वे टीम सहभागी नसेल. त्याचबरोबर आगामी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये झिम्बाब्वेच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आयसीसीने केली झिम्बाब्वेची हकालपट्टी
पुन्हा झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाची निवडणूक होईल आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या बोर्ड मिटींगमध्ये त्यांच्या प्रगतीची समीक्षा केली जाईल असे आयसीसीने म्हटले आहे. कोणत्याही सदस्यावर बंदी आणण्याचा निर्णय हा गंभीर आहे. पण आम्हाला खेळाला राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवायचे असल्याचे आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी म्हटले. आयसीसी संविधानाचे झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डातर्फे उल्लंघन झाले असल्यामुळे हे कायम सुरु राहण्यास आम्ही परवानगी देऊ शकत नाही असेही ते म्हणाले. आयसीसीच्या संविधानानुसार झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने चालावे असे आयसीसीला वाटत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
