मिठाईच्या दुकानात घुसखोरी करणारे पेंग्विन पोलिसांच्या ताब्यात


न्यूझीलंड मध्ये एका मिठाईच्या दुकानात वारंवार घुसखोरी करणाऱ्या पेंग्विनच्या जोडीला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. अर्थात काही तासात या पेंग्विन जोडीची सुटका करण्यात आली.

हकीकत अशी कि, जपानी मिठाई विकणाऱ्या एका दुकानात दोन पेंग्विन वारंवार घुसत होते त्यामुळे दुकानदाराने त्यांना बाहेर काढले पण ते पुन्हा पुन्हा आत येऊ लागल्यावर अखेर त्याने पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी या पेंग्विनना पकडले आणि त्यांची रवानगी वेलिंग्टन झु मध्ये केली. आजकाल पेंग्विन पक्षांनी त्रास देण्याच्या घटना न्यूझीलंड मध्ये वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे कारण अनेकदा हे पक्षी लोकांना चावे घेत आहेत. वेलिंग्टन हार्बरवर पेंग्विन पक्षांच्या ६०० जोड्या असून त्यांची देखभाल न्यूझीलंडचा संरक्षण विभाग करतो. मात्र पोलिसांनी पेंग्विनना पकडल्याची घटना प्रथमच घडली आहे.

संरक्षण विभागाचे प्रमुख जॅक मोस म्हणाले, सध्या पेंग्विनचा ब्रीडिंग सिझन आहे त्यामुळे ते सुरक्षित जागेच्या शोधात असतात. दुकानात फर्निचर खाली याचमुळे ते लपत होते. वेलिंग्टनच्या अनेक घरातही पेंग्विन पक्षांनी त्यांची घरटी केली आहेत.

Leave a Comment