दुर्दैव एका रामभरोसे शहराचे


नेमेचि येतो मग पावसाळा या उक्तीप्रमाणे जून महिन्यात नैऋत्य मोसमी पाऊस येतो आणि मुंबईकरांना वेध लागतात अपघाताचे. कधी हा अपघात रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल कोसळण्याचा असतो, कधी छत्रपती शिवाजी टर्मिनसबाहेरील पूल कोसळण्याचा असतो तर कधी डोंगरीतील इमारत कोसळण्याचा असतो. पाऊस सुरु झाला की मुंबईत दुर्घटनांची साखळी सुरू होते. त्यातील बळी सरकार दरबारी केवळ आकडेवारी बनून राहतात.

दरवर्षी पावसाळ्यात अशा प्रकारच्या दुर्घटना होऊन निष्पाप लोकांचे बळी जातात. यंदाच्या पावसाळ्यातही परिस्थिती फारशी वेगळी नाही. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत आतापर्यंत 40 च्या वर लोकांचे वेगवेगळ्या दुर्घटनेत बळी गेले आहेत. गटाराचे झाकण उघडे असल्याने त्यात पडून दोन मुलांचा मृत्यू झाला. तरीही एखादी भयंकर घातक दुर्घटना घडण्याची भीती मुंबईकरांना वाटत होती. ज्याची भीती होती तेच घडले आणि डोंगरी परिसरात इमारत कोसळून डझनावारी लोकांचा जीव गेला. ही इमारत 100 वर्षे जुनी होती आणि या इमारतीत 15 कुटुंबे राहत होती. यातील किमान 12 जणांचा या घटनेत बळी गेला आहे. अशा प्रकारच्या 14 हजार धोकादायक इमारती मुंबापुरीत उभ्या आहेत. कोट्यवधींचे पोट भरणाऱ्या ‘श्रीमंत’ मुंबई नगरीच्या दफ्तरी आणखी एक प्राणघातक अपघाताची नोंद झाली.

मुंबईत दरवर्षीच धोकादायक इमारती कोसळून अनेकांचे मृत्यू होतात. मुंबई महानगरपालिकेने 2017 मध्ये 30 वर्षांहून अधिक जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची घोषणा केली होती. मात्र या इमारतीचे ऑडिट त्यात होणे शक्य नव्हते, कारण तिचे बांधकाम बेकायदा असल्याचे आता समोर आले आहे. ही इमारत इतकी जर्जर झाली असतानाही आजपर्यंत महापालिका अधिकाऱ्यांचे तिच्याकडे लक्ष का गेले नाही? असे अनेक प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. तसे ते यापूर्वीच्या घटनांमध्येही निर्माण झाले होते. मात्र त्यांची उत्तरे आजतागायत मिळालेली नाही.

मुंबई हे भारताचे आर्थिक केंद्र, आर्थिक राजधानी. हिंदी चित्रपटसृष्टीचे हृदय आणि कापड उद्योगापासून रसायनांपर्यत अनेक उद्योगांचे माहेरघर. आजही या शहराने आपले हे स्थान टिकवून ठेवले आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मुंबईचे हेच आकर्षण आज त्याच्या जीवावर उठले आहे. सन 1947मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तानमधून आलेल्या निर्वासितांमुळे आधी मुंबईची लोकसंख्या वाढली. विसाव्या शतकाच्या मध्यानंतर देशभरातील स्थलांतरितांचे लोंढे मुंबईवर आदळू लागले. याच काळात राजकारण्यांचेही या शहराकडे दुर्लक्ष झाले. उलट मुंबईपासून होता होईल तेवढा फायदा घेण्याचा प्रयत्न एकामागोमाग सरकारांनी घेतला. त्यामुळे आधीच बेट असलेल्या या शहरात दीड लोकसंख्या झाली आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. येथील मूलभूत सोईसुविधांवर ताण आला.

मुंबई महानगरपालिकेत गेली अनेक वर्षे भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. मात्र या दोन पक्षांचे संबंध तळ्यात-मळ्यात प्रकारचे आहेत. कधी त्यांच्यात प्रमाणाबाहेर वैर असते तर कधी ते अगदी एकजीव होऊन काम करतात. त्यांच्यातील या कलगीतुऱ्यामुळे पालिकेचे जे मूळ काम आहे ते करायला त्यांना सवड मिळत नाही. म्हणूनच नियोजनशून्य आणि भ्रष्ट कारभारामुळे कधी इमारती कोसळतात, कधी पूल कोसळतात, कधी गटारीत पडून माणसे वाहून जातात तर कधी आगी लागून इमारती व माणसांचा कोळसा होतो.
दरवेळी अशा अप्रिय घटना घडल्यानंतर थातूरमातूर कारवाई केल्याचे दाखवले जाते. विधानसभेत व बाहेरही विरोधी पक्ष प्रश्न विचारल्यासारखे करतात आणि पुन्हा काही दिवसांनी परिस्थिती मूळ पदावर येते. हे नेहमीचेच झाले आहे. हे सारे केव्हा थांबणार, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नाही.

खरे तर सरकार काँग्रेसचे असो किंवा भाजप-शिवसेनेचे, ते मुंबई शहराबाबत निष्क्रिय असते हे दिसून आले आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी मुंबईला फक्त सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून पाहिले आहे. त्याचीच ही परिणती आहे. स्वप्ननगरी म्हणविले जाणारे एक शहर आज रामभरोसे जगत आहे, हाच या सर्वाचा अर्थ!

Leave a Comment