आज कुलभूषण जाधव प्रकरणाचा निर्णय देणार आंतरराष्ट्रीय न्यायालय


हेग – संयुक्त राष्ट्रांचे हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय आज भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी निकाल देणार आहे. कुलभूषण जाधव हे न्यायालयाच्या निकालानंतर पाकिस्तानच्या तुरुंगात राहणार की नाही हे स्पष्ट होईल.

पाकिस्तानी लष्कराने 3 मार्च 2016 मध्ये कुलभूषण जाधव यांना तथाकथित हेरगिरीच्या आरोपावरून पकडले होते. तसेच, त्यांना कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय परस्पर फाशीची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी भारताने पाकिस्तानची एकतर्फी भूमिका तसेच, कारवाई करण्यावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणली होती.

कुलभूषण यांना बलुचिस्तान प्रांतात पकडल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला होता. तसेच, इराणमार्गे कुलभूषण पाकिस्तानात घुसल्याचा बनाव रचला होता. पाकिस्तानी मिलिटरी न्यायालयाने भक्कम पुरावे असल्याची बतावणी करत कुलभूषण यांना कायदेशीर प्रक्रियेशिवाय एकतर्फी फाशीची शिक्षा सुनावली होती. पण भारतीय वकील हरीष साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानचे सर्व मुद्दे खोडून काढले होते. यामुळेच कुलभूषण यांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती आणली होती. तसेच, पाकिस्तानला चांगलेच खडसावले होते.

पाकिस्तानने ३ वर्षांपासून जाधव यांना विनाकारण डांबून ठेवले आहे. तसेच, जाधव यांच्याशी संपर्क करू देण्यासाठी भारताच्या परराष्ट्र वकीलातीने पाकिस्तानला १३ वेळा विनंती केली होती. पण याकडे पाकिस्तानने कानाडोळा करून व्हिएतनाम कराराचे उल्लंघन केले आहे.

Leave a Comment