पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार ‘बधाई हो’ची तिकडी


बॉक्स ऑफिसवर आयुष्मान खुरानाचा ‘बधाई हो’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.नीना गुप्ता आणि गजराज राव यांनी या चित्रपटात आयुष्मानच्या आईवडिलांची भूमिका साकारली होती. त्यांनी चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचेही प्रचंड कौतुक झाले होते. ते आता पुन्हा एकदा आयुष्मानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. दोघेही पुन्हा एकदा आयुष्मानचाच गाजलेला ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये त्याच्या आईवडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

बॉक्स ऑफिसवर आयुष्मान आणि भूमी पेडणेकर यांचा ‘शुभ मंगल सावधान’ हा चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटाचा सिक्वेलही आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात आणखी कोण दिसणार याबद्दलची माहिती अद्याप करण्यात आलेली नाही. पण यासंदर्भात एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव देखील महत्वपूर्ण भुमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक आनंद एल. राय करणार असून त्यांनी या चित्रपटाबाबत बोलताना सांगितले, की शुभ मंगल ज्यादा सावधान या चित्रपटाची कथा खूप सुंदर आहे. ही कथा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणेल. हा चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल.

Leave a Comment