न्यूझीलंडला महागात पडला मार्टिन गुप्टिलचा ‘तो’ रिव्हिव्यू


लॉर्डस – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अतिशय रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लडने बाजी मारत विश्वचषकावर आपले नाव कोरले. तोडीस-तोड असा न्यूझीलंडने देखील खेळ केला, पण सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात इंग्लंडने चौकांराच्या जोरावर विजय मिळवला. एक-एक धाव महत्त्वाची असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडकडून झालेल्या काही चुका त्यांना चांगल्याच महागात पडल्या. सलामीवीर मार्टिन गुप्टिलने वाया घालवलेल्या रिव्हीव्यूची देखील यामध्ये चांगलीच चर्चा आहे.

मार्टिन गुप्टिल तिसऱ्या षटकात ख्रिस व्होक्सच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्यावेळी रिव्हीव्यू घेण्याची आवश्यकता नव्हती. कारण चेंडू सरळ-सरळ मधल्या यष्टीवर जात असल्याचे दिसत होते. पण तेथे गुप्टिलने रिव्हीव्यू घेतला गेला आणि तिसऱ्या पंचानी त्याला बाद घोषित केल्यामुळे न्यूझीलंडकडील रिव्हीव्यू संपले. न्यूझीलंडला याचा मोठा धक्का रॉस टेलर बाद झाला तेव्हा बसला. मार्क वूडने अनुभवी आणि भारताविरुद्ध महत्त्वाची खेळी करणाऱ्या टेलरला पायचित केले. वूडचा चेंडू यष्ट्यांवरून जात असल्याचे बॉल ट्रॅकींगमधून दिसत होते. पण, टेलरला रिव्हीव्यू शिल्लक नसल्याने मैदान सोडावे लागले.


न्यूझीलंडला शेवटच्या थरारक षटकात ‘ओव्हर थ्रो’चा मोठा फटका बसला. ब्रेन स्टोक्सने षटकातील चौथ्या चेंडूवर जोरदार फटका मारला. सीमारेषेजवळ चेंडू अडवल्याने त्याला केवळ दोन धावा मिळाल्या, पण चेंडू यष्टीला लागून सीमारेषा पार झाल्यामुळे इंग्लंडला दोनच्या ठिकाणी सहा धावा मिळाल्या. या चार धावा जाणे, न्यूझीलंडला खूप महागात पडले.

Leave a Comment