आयपीएलमध्ये दोन नव्या संघाचा होणार समावेश ?


मुंबई : जगातील सर्वात मोठा टी-20 लीग अशी ओळख असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आयपीएलच्या येत्या 2021 मध्ये होणाऱ्या सिझनमध्ये 10 संघ खेळण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये सध्या 8 संघ खेळतात. पण 2021 च्या आयपीएलमध्ये अहमदाबाद, पुणे आणि रांची किंवा जमशेदपूर यामधील दोन संघ खेळताना दिसतील.

अहमदाबादसाठी अदानी ग्रुप, पुणेसाठी आरपीजी संजीव गोयंका ग्रुप आणि रांची किंवा जमशेदपूरसाठी टाटा ग्रुप रेसमध्ये आहे. 2011 मध्ये याआधी आयपीएलमध्ये 10 संघ खेळले होते. पण दोन संघ काही विवादांनंतर बाद करण्यात आले आणि ही संख्या पुन्हा आठवर आली होती.

आयपीएलमध्ये दोन नवीन संघ समाविष्ट करुन घेण्यासाठीची योजना तयार झाली असून सध्या याबाबत चर्चा सुरू आहे. चर्चा सुरळीत पार पडली तर दहा संघ 2021च्या आयपीएलमध्ये खेळताना दिसतील. आयपीएल संघ मालक आणि अधिकारी यांच्यात याबाबत लंडनमध्ये एक बैठक पार पडली. नवीन दोन संघ जर दाखल झाले तर याचा फायदा आयपीएललाच होईल, यावर सगळ्यांचे एक मत झाले आहे.

अहमदाबादची फ्रॅन्चाईजी घेण्यासाठी 2010 मध्ये अदानी ग्रुपने प्रयत्न केले होते, पण ते यशस्वी झाले नाहीत. तर सहारा ग्रुपने 2011 मध्ये पुणे वॉरिअर्स संघ विकत घेतला होता. पण पुणे वॉरिअर्सला 2013 मध्ये आयपीएलमधून हटवण्यात आले आहे. पुणे वॉरिअर्सने आयपीएलच्या 2011, 2012, 2013 या सीजनमध्ये भाग घेतला होता. 2011 मध्ये कोच्ची टस्कर संघही आयपीएलमध्ये सामील करण्यात आला होता. कोच्ची टस्करला त्याच वर्षी आयपीएलमधून हटवण्यात आले होते.

Leave a Comment