बकिंगहॅम पॅलेसमध्ये अनाहूत व्यक्ती अनधिकृत रित्या दाखल होते तेव्हा!


एक बावीस वर्षीय तरुण बकिंगहॅम पॅलेसच्या कुंपणावरून चढून जाऊन राजमहालामध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असताना तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अटक केल्याची धक्कादायक घटना अलीकडेच घडली असून, पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास या व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे समजते. बकिंगहॅम पॅलेसच्या संरक्षक कुंपणावरून चढून जाऊन हा युवक राजमहालाचे प्रवेशद्वार जोरजोराने ठोठावीत असता, त्या आवाजाने सुरक्षा कर्मचारी सचेत झाले, आणि त्यांनी त्वरेने या युवकाला अटक केली. सुरुवातीला या युवकाजवळ काही हत्यार असावे असा संशय सुरक्षा कर्मचाऱ्यांना होता. मात्र अटक केल्यानंतर या युवकाची कसून झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे कोणतेही हत्यार आढळले नाही. सध्या सेन्ट्रल लंडन पोलीस स्टेशन येथे हा युवक पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समजते.

बकिंगहॅम पॅलेसची प्रवेशद्वारे रात्रीच्या वेळी आतून बंद करण्यात येत असल्याने या युवकाला राजमहालामध्ये प्रवेश करता आला नाही. सध्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये अनेक ठिकाणी नूतनीकरणाचे काम सुरु असून, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या शाही परिवारातील एकमेव व्यक्ती आहेत. राणी एलिझाबेथ यांचे पती सँड्रींगहॅम येथे वास्तव्यास असून, प्रिन्स चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला यांचे वास्तव्य क्लॅरेंस हाऊस येथे आहे. राणी एलिझाबेथचे नातू प्रिन्स विलियम त्यांच्या परिवारासमवेत केन्सिंग्टन पॅलेस येथे वास्तव्यास असून, प्रिन्स हॅरी आणि त्यांच्या परिवाराचे वास्तव्य फ्रॉगमोर कॉटेज येथे आहे. इतर शाही परिवारजनांपैकीही कोणी बकिंगहॅम पॅलेसमध्ये वास्तव्यास नाही.

राणी एलिझाबेथ यांचे वास्तव्य बकिंगहॅम पॅलेसमध्ये असताना अनाहूत व्यक्तीने राजमहालामध्ये दाखल होण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. या पूर्वी सुमारे सदतीस वर्षांपूर्वी मायकल फेगन नामक मनुष्य केवळ राजमहालातच नाही, तर चक्क राणी एलिझाबेथच्या शयनकक्षामध्ये दाखल झाला होता. राणी एलिझाबेथने मायकलला आपल्या शयनकक्षामध्ये पाहिले, आणि बिछान्याच्या जवळच असलेले एक गुप्त बटन दाबून सुरक्षा कर्मचाऱ्यांना धोक्याची सूचना दिली. राणी एलिझाबेथने बकिंगहॅम पॅलेसच्या टेलिफोन एक्स्चेंजमध्ये फोन करून घडल्या प्रकारची सूचनाही दिली, मात्र कोणीतरी थट्टा करीत आहे असे समजून ऑपरेटरने या सूचनेकडे दुर्लक्ष केले. एव्हाना मायकलची अस्वस्थता वाढत चालली होती. पाहता पाहता तो इतका अस्वस्थ झाला, की राणीच्या शयनकक्षामधील टेबलवर असलेला काचेचा अॅश ट्रे त्याने झटक्याने आदळला आणि त्यातील काचेच्या तुकड्याने स्वतःचे मनगट कापून घेण्याबद्दल बोलू लागला.

सुरक्षा विभागाकडून त्वरित प्रतिसाद न आल्याने मायकल जे करीत आहे, ते पहात राहण्यापलीकडे काहीही करणे शक्य नसल्याने राणीने ही घाबरून न जाता मायकलच्या समोर बसून त्याचे सर्व बोलणे शांतपणे ऐकून घेतले. इतकेच नाही, तर त्याच्या खासगी आयुष्यामधील अडचणी जाणून घेत राणीने त्याला धीरही दिला. तोवर राणीचे खासगी सचिव पॉल व्हायब्र्यू तिथे पोहोचले आणि त्यांनीही मायकलला शांत करण्याचे प्रयत्न सुरु केले. मायकल थोडासा बेसावध होताच पॉल यांनी ही संधी साधून मायकलला झटक्याने पकडले आणि राणी एलिझाबेथ यांच्यापासून दूर ढकलून दिले. राणीच्या मदतीसाठी तिथे पोहोचलेल्या सेविकेने त्वरेने खिडकीपाशी जाऊन बाहेरील सुरक्षा कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधून घेत यांना धोक्याची सूचना दिली. ही सूचना मिळताच सुरक्षा कर्मचारी त्वरेने राणीच्या शयनकक्षामध्ये पोहोचले, आणि त्यांनी मायकलला ताब्यात घेतले. पुढे झालेल्या तपासणीमध्ये मायकल स्किझोफ्रेनिया नामक मानसिक विकाराने ग्रस्त असल्याचे निदान झाले.

Leave a Comment