मी आजही स्वतःला लहान मुलगाच समजतो


कोणत्याही दिग्दर्शका अथवा कलाकारासोबत कोणत्याही प्रकारचा संबंध नसतानाही ओळखीविना स्वतःला सिद्ध करून दाखवणाऱ्या कलाकारांची संख्या हिंदी चित्रपटसृष्टीत फारच कमी आहे. अशात याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रत्येकाच्या मनात घर बनवणारा अभिनेता रणवीर सिंह. गेली १० वर्ष स्वतःच्या अभिनय कौशल्याने बॉलिवूड गाजवणारा हा अभिनेता आपल्या नम्र स्वभावामुळे चांगलाच चर्चेत असतो.

चित्रपटाचे चित्रीकरण संपवून बाहेर येताना असो वा विमानतळावर असो, कलाकार समोर दिसताच अनेकांचे कॅमेरे त्यांच्यावर असतात. छायाचित्रकारांवर अशावेळी अनेक कलाकार भडकून तेथून निघून जातात. पण नेहमीच त्यांना हसत हसत पोज देताना रणवीर दिसतो. रणवीरला याबद्दल एका मुलाखतीत विचारले असता, आपण अजूनही स्वतःला एक स्टार न समजता लहान मुलगा समजतो, असे उत्तर रणवीरने दिले.

यासोबतच अभिनेत्री प्रियंका चोप्रासोबत झालेले आपले संभाषणही त्याने सांगितले. रणवीर म्हणाला, मला प्रियंका म्हणते, तू तो मुलगा आहेस, ज्याला या गोष्टीवर विश्वासच बसत नाही की तो आज एक स्टार झाला आहे. आजही जो हेच बोलतो, की आई मी स्टार झालो, बघ हे लोक माझा फोटो काढतात, असे म्हणत रणवीर हसू लागला. दरम्यान सध्या आपल्या आगामी ‘८३’ चित्रपटाच्या चित्रीकरणात रणवीर व्यस्त आहे. ८३ च्या विश्वचषक स्पर्धेवर आधारित असलेल्या या चित्रपटात तो कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे.

Leave a Comment