मुंबई पोलिसांनी सौ. फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर पायलला केले अनब्लॉक


मुंबई पोलिसांनी वायफळ आणि वादग्रस्त वक्तव्यांना कंटाळून बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीला ट्विटरवर ब्लॉक केले होते. पण मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यामुळे पायलला पोलिसांना पुन्हा अनब्लॉक करावे लागले आहे.

सोशल मीडियावर अनेकदा आक्षेपार्ह वक्तव्ये पायल रोहतगी करत असते. तिने काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांसंदर्भात केलेले एक ट्विट चांगलेच व्हायरल झाल्यामुळे तिला वैतागून मुंबई पोलिसांनी ट्विटरवर ब्लॉक केले होते. पायलने यानंतर आक्रमक भूमिका घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे या कथित अन्यायाविरोधात दाद मागितली होती. स्वत:च्या ट्विटमध्ये तिने या तिघांना टॅग केले होते. यानंतर अमृता फडणवीस यांनी पायल रोहतगीच्या या ट्विटची दखल घेतली. हे ट्विट रिट्विट करण्याबरोबरच अमृता यांनी मुंबई पोलिसांना उद्देशून आणखी एक ट्विट केले.


सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिक त्यांचे वैयक्तिक मत व्यक्त करत असतात. त्यांचा या सगळ्यात धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसतो. त्यामुळे सरकारी संस्थांनी त्यांना सोशल मीडियावर अशाप्रकारे ब्लॉक करणे योग्य नाही. तेव्हा कृपया मुंबई पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालावे, असे अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. मुंबई पोलिसांनी यानंतर तात्काळ पायल रोहतगीला अनब्लॉक करत अमृता फडणवीस यांना स्पष्टीकरण दिले.

नेहमीच प्रत्येक नागरिकाच्या पाठिशी मुंबई पोलीस उभे राहिले आहेत. पायल रोहतगीचे ट्विटर अकाऊंट सुरु असून आम्ही कोणत्याही नागरिकाशी संवाद तोडत नाही. याबाबत कोणताही तांत्रिक बिघाड असल्यास आमची टीम त्याचा शोध घेत असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment