केंब्रिज अॅनालिटिका डेटा लीक प्रकरणी फेसबुकला 34 हजार कोटींचा दंड


मुंबई : अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनने केंब्रिज अॅनालिटिका डेटा लीक प्रकरणी फेसबुकला 5 अब्ज डॉलर्सचा (34 हजार कोटी) दंड ठोठावला आहे. आजवरच्या इतिहासात एखाद्या टेक्नॉलॉजी कंपनीला ठोठावलेला हा सर्वाधिक दंड आहे. 2012 मध्ये याआधी गूगलला 22 मिलियन डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला होता.

यासंदर्भात विविध वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकच्या युझर्सच्या खाजगी माहितीचा गैरवापर केंब्रिज अॅनालिटिका डेटा लीक प्रकरणात केल्याच्या आरोपवरुन हा दंड ठोठावण्यात आला आहे. अमेरिकेची फेडरल ट्रेड कमिशनकडे या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी होती.

फेसबुक डेटा लीक प्रकरणाचे सर्वात मोठे प्रकरण मार्च 2018 मध्ये समोर आले होते. फेडरल ट्रेड कमिशनच्या तपासात फेसबुककडून युजर्सची डेटा प्रायव्हसी आणि सुरक्षेत चूक झाल्याचे आढळून आल्याचे आढळून आले. पण याविषयी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया फेडरल ट्रेड कमिशन आणि फेसबुकने दिलेली नाही.

फेसबुकला या कारवाईचा फारसा फरक पडेल असे वाटत नाही. कारण या कारवाईची पूर्वकल्पना फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांना होती. त्यांनी त्यानुसार 3 अब्ज डॉलर एवढी रक्कम आधीच जमवली होती. याशिवाय यावर्षी पहिल्या तीन महिन्यात फेसबूकने 15 बिलियन डॉलरची कमाई केली असल्यामुळे दंडाची रक्कम फेसबुकच्या कमाईच्या तुलनेत कमी आहे.

Leave a Comment