तमंचे पर डिस्को करणाऱ्या आमदाराची भाजपमधून हकालपट्टी


देहराडून : भाजपने उत्तराखंडमधील ‘रंगेल’ आमदार कुंवर प्रणव सिंहची पक्षातून कायमस्वरूपी हकालपट्टी केली आहे. हातामध्ये रिव्हॉल्वर घेऊन दारू पिऊन कुंवर प्रणव सिंहचा नाचतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आमदार कुंवर प्रणव सिंह या व्हिडीओत गाण्यावर एका हातात एक-दोन नाही तर तीन रिव्हॉल्वर आणि दुसऱ्या असॉल्ट रायफल नाचवत असताना दिसत आहेत. कुंवर प्रणव सिंह या व्हिडीओमध्ये एक एक करुन शस्त्र आपल्या हाती घेत दारुही पिताना दिसत आहे, तसेच अपशब्दही उच्चारताना दिसून येत होता.


भाजपने हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या आमदाराला कारणे दाखवा नोटीस देखील जारी केली होती. भाजपचे उत्तराखंडचे प्रभारी श्याम जाजू यांनी सांगितले की, दबाव तंत्राचा या याप्रकरणी प्रश्न नाही तर कार्य पद्धती कशी असावी हा सवाल आहे. सार्वजनिक जीवन कसे जगावे हे नेत्यांना शिकायला हवे. कुंवर प्रणव सिंह यांच्याविरोधात याचमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. आमच्या पक्षात अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, या कारवाईनंतर हा संदेश दिला गेला आहे.

Leave a Comment