न्यूझीलंडच्या संघात आम्ही नक्कीच धोनीची निवड करु – केन विल्यमसन


मँचेस्टर – भारत विरुध्द न्यूझीलंड संघात आयसीसी विश्वचषक स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना पार पडला. पावसामुळे हा सामना दोन दिवस खेळण्यात आला. जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या भारताला या सामन्यात न्यूझीलंडने धक्का देत १८ धावांनी विजय मिळवला. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीबद्दल या सामन्यानंतर बरीच चर्चा झाली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनलाही धोनीविषयी प्रश्न विचारण्यात आले. केनने त्यावर मजेशीर उत्तर दिले. केन विल्यमसनला सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तू जर भारताचा कर्णधार असता तर धोनीला ११ जणांच्या संघात खेळवले असते का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर नागरिकत्व जर धोनीने बदलले तर त्याची आम्ही आमच्या संघात नक्कीच निवड करु, असे विल्यमसन म्हणाला.


न्यूझीलंडसाठी खेळण्यास धोनी पात्र नाही. पण जगातील सर्वोत्तम खेळाडू तो आहे. जर मी भारताचा कर्णधार असतो तर त्याला संघात घेतले असते. धोनीचा अनुभव दांडगा आहे. परिस्थितीनुसार तो खेळी करतो. उपांत्य सामन्यात त्याने मोक्याच्या क्षणी चांगली खेळी केली. नागरिकत्व तो बदलणार आहे का? कारण आम्ही मग त्याच्या निवडीचा विचार करु, अशा शब्दात केन विल्यमसनने धोनीवर स्तुतीसुमने उधळली.

Leave a Comment