मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा


पंढरपूर – आज विठ्ठल आणि रुक्मिणीची पंढरपुरात महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशी निमित्त सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यंदाच्या पूजेचा मान लातूरमधील अहमदपूरच्या चव्हाण दाम्पत्याला मिळाला.

विठ्ठलाच्या मूर्तीला आज प्रथम चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्यात आला. विठ्ठलाची यानंतर मंत्रोपचारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्निक आणि लातूरचे शेतकरी विठ्ठल चव्हाण दांपत्याच्या हस्ते पूजा करण्यात आली. महाआरतीनंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि चव्हाण यांना विठ्ठलाची तुळशीची माळ देत पूजा संपन्न झाली. आषाढी आणि कार्तिकीला विठ्ठलाची महापूजा करण्यात येते. शिवाजी महाराजांच्या काळात हा मान महाराजांकडे होता. त्यानंतर महापूजेचा मान हा साता-याच्या गादीकडे सोपवण्यात आला.

इंग्रजांच्या काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांना हा मान मिळत असे. स्वतंत्र भारतात त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे हा मान आला. त्यानुसार आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही महापूजा केली जाते, तर ही महापूजा कार्तिकीला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. यंदा तब्बल 15 लाख वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात दाखल झाले आहेत. वारकऱ्यांच्या भल्यामोठ्या रांगा विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी लागल्या आहेत. तासंतास रांगेत उभे राहून भाविक पांडुरंगाचे दर्शन घेत आहेत.

Leave a Comment