नवी दिल्ली – २०१९ विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचे आव्हान अखेरीस संपुष्टात आले आहे. भारतीय संघावर केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाने १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. भारतीय संघ २४० धावसंख्येचा पाठलाग करताना २२१ धावांपर्यंत मजल मारु शकला. न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर भारताचे सर्व दिग्गज फलंदाज ढेपाळले. अखेरच्या फळीत रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनीचा अपवाद वगळता सर्वांनी निराशा केली.
न्यूझीलंडच्या चुकीकडे पंचांकडून कानाडोळा
शतकी भागीदारी रचत जाडेजा आणि धोनी यांनी भारतीय संघासाठी विजयाच्या आशा जागवल्या. पण मोक्याच्या क्षणी दोन्ही फलंदाज बाद झाल्याने भारताच्या हातातून सामना निसटला. धोनीची रनआऊट विकेट या सामन्यात ही दुर्दैवी मानली जात आहे. मार्टीन गप्टीलने चेंडू थेट फेकत धोनीला माघारी धाडले. पण पंचांनी याआधी मैदानावरील न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या एका चुकीकडे डोळेझाक केल्याची चर्चा सुरु आहे.
फर्ग्युसन टाकत असलेले षटक हे पॉवरप्लेमधील षटक होते. आयसीसीच्या नियमांनुसार पॉवरप्लेमध्ये पाचपेक्षा जास्त क्षेत्ररक्षक हे मर्यादीत सर्कलच्या बाहेर उभे राहू शकत नाही. असे झाल्यास नो-बॉल ठरवण्यात येतो. पण धोनी फलंदाजी करत असताना फर्ग्यसुनच्या गोलंदाजीवर न्यूझीलंडचे सहा क्षेत्ररक्षक मर्यादीत सर्कलच्या बाहेर असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
भारतीय चाहत्यांमध्ये या व्हिडीओवरुन अनेक मतमतांतर आहेत. काहींच्या मते पंचांनी हा चेंडू नो-बॉल दिला असता तरीही, धोनीला धावबाद होऊन माघारी परतावे लागले असते. तर काही चाहत्यांच्या मते ही बाब चेंडू टाकायच्या आधीच पंचांना लक्षात आली असती, तर त्यांनी न्यूझीलंडच्या कर्णधाराला याबद्दल सूचना दिली असती आणि क्षेत्ररक्षण बदलून निकाल कदाचित वेगळा लागू शकला असता.