क्रिकेटमध्ये निराशा, अॅथलेटिक्समध्ये दिलासा!


समस्त भारतीयांचे डोळे लागून राहिलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पराभव झाला. ब्रिटनमध्ये ही पराजयाची कथा लिहिली जात असतानाच भारतीय क्रीडापटूंनी अन्यत्र मैदान गाजवले. क्रिकेटमध्ये निराशा झाली असली तरी या क्रीडापटूंनी या खेळांमध्ये देशवासियांना दिलासा दिला आहे.
क्रिकेटची उपांत्य फेरी सुरू असतानाच भारताची प्रमुख धाविका दुती चंद हिनेही इटालीत सुरू असलेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून एक नवा इतिहास रचला. दुती हिने 30व्या समर युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.

दुती चंद सध्या 23 वर्षांची आहे. या प्रकारातील भारतासाठीचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे. यापूर्वी युनिव्हर्सिटी स्पर्धेच्या इतिहासात कोणत्याही भारतीय खेळाडूला 100 मीटर स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागा मिळाली नव्हती. दुती चंद हिने स्वित्झर्लंडची धावपटू एजला डेल पोंटे हिला मात दिली. या दोघींतील अंतर केवळ 0.1 सेकंदांचे होते यावरून ही शर्यत किती अटीतटीची झाली असेल याची कल्पना येते. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत चार पदके मिळविले असून तीन पदके नेमबाजांनी मिळवून दिले आहेत.

”अनेक वर्षांची मेहनत आणि आपल्या आशीर्वादाने मी पुन्हा एकदा नेपल्स येथे झालेल्या वर्ल्ड यूनिव्हर्सिटी गेम्समध्ये 11.32 सेकंदांचा वेळ नोंदवत 100 मीटर स्पर्धेचे सुवर्णपदक आपल्या नावे केले,” असे ट्वीट दुतीने बुधवारी केले.

दुसरीकडे धिंग एक्स्प्रेस या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या 19 वर्षीय हिमा दास हिनेही असाच पराक्रम केला आहे. या धिंग एक्सप्रेसने नुकतीच पोलंडमधील कुत्नो अॅथलेटिक्स मीटमध्ये 200 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. एका आठवड्याआधीच पोलंडमध्येच झालेल्या पॉझ्नान अॅथलेटिक्स ग्रां प्री स्पर्धेत तिने पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले होते. या गुणी खेळाडूने केवळ 23.65 सेकंदात हे अंतर पार केले आणि तेही पाठीच्या दुखण्याने त्रस्त असताना!

विशेष म्हणजे पोलंडमध्ये विजेती ठरणारी हिमा दास ही एकमेव तरुण भारतीय धावपटूनाही. तिच्यासारखे अनेक उदयोन्मुख धावपटू देशाचे नाव उंचावत आहेत. उदाहरणार्थ, 24 वर्षांच्या मुहम्मद अनास यानेही कुटनो येथील स्पर्धेत पुरुषांच्या 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. अनास याला ही शर्यत जिंकण्यासाठी 21.18 सेकंदांचा वेळ लागला. यापूर्वी त्याने जून 2016 मध्ये पोलिश अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 400 मीटर स्पर्धेत 45.40 सेकंदांचा वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम मोडला होता.

भारताचीच आणखी एक धावपटू 22 वर्षीय व्ही. के. विस्मया हिने पॉझ्नान येथील शर्यतीत 23.75 सेकंदांची वेळ नोंदवली. ही तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे. खरे तर, नुकत्याच संपलेल्या कासनोव मेमोरियल मीट या स्पर्धेत भारतीय ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट्सनी तब्बल 12 सुवर्णपदकांसह 1 9 पदके जिंकली आणि ही केवळ दोन दिवसीय स्पर्धा होती.

पुढील वर्षी टोकियोत होणारी उन्हाळी ऑलिम्पिक 2020 स्पर्धा तोंडावर आलेली असताना भारताच्या दृष्टीने याहून चांगली बातमी असू शकत नाही. ब्राझीलमधील रिओ डी जनेरियो येथे झालेल्या 2016 उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये भारतीय धावपटूंना फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती आणि त्यांनी कोणतीही पदके आणली नाहीत. यावेळी मात्र ऑलिम्पिकच्या पूर्वी भारतीय धावपटूंची कामगिरी उंचावलेली दिसते. सर्व खेळाडू या स्पर्धेसाठी सज्ज झालेले दिसतात आणि ते कठोर परिश्रम करत आहेत.

मात्र भारतीय अॅथलेटिक्सला अद्यापही बराच मोठा पल्ला गाठायचा आहे विशेषतः देशातील खेळांच्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत. क्रीडा संस्कृतीचा अभाव, उत्तम पात्रता असलेल्या प्रशिक्षकांची किंवा विशेषज्ञांची टंचाई, खेळाच्या मैदानांची आणि व्यवस्थेची कमतरता आणि प्रशिक्षक व प्रशिक्षणासाठी प्रायोजकांचा अभाव या क्रिकेट वगळता अन्य खेळांना भेडसावणाऱ्या समस्या आहेत. त्यांच्यामुळे भारतीय खेळाडूंची कामगिरी अपेक्षेप्रमाणे उंचावत नाही, असे मानले जाते.

अशा परिस्थितीतही आपले खेळाडू भारताला प्रतिष्ठा मिळवून देत आहेत आणि आपली सर्वोत्तम कामगिरी करून दाखवत आहेत. क्रिकेटवर अतोनात प्रेम करणाऱ्या आणि क्रिकेटबद्दल अतिरेकी उत्साह दाखविणाऱ्या क्रीडाप्रेमींनी त्यांची दखल घ्यावी, इतकीच अपेक्षा!

Loading RSS Feed

Leave a Comment