अल कायदाच्या म्होरक्याने दिली भारताला धमकी


नवी दिल्ली – काश्मीर मुद्यावरून पुन्हा एकदा ओसामा बिन लादेनच्या दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीने गरळ ओकली आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद भडकावणारा संदेश त्याने जारी केला आहे. दरम्यान, त्याने ‘Don’t Forget Kashmir’ या नावाने संदेश देत केवळ भारतालाच इशारा दिला नाही, तर भारतात दहशतवाद पसरवणाऱ्या दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या कृत्यांचे त्याने समर्थनही केले आहे.

दहशतवादी मुसाचेही छायाचित्र अल कायदाच्या मीडिया शाखेने जारी केलेल्या संदेशात लावण्यात आले आहे. अल जवाहिरीचा काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवणाऱ्या दहशतवाद्यांसमोर येऊन त्यांना समर्थन देणे आणि त्यांचे समर्थन घेणे हा त्यामागचा हेतू असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, आपल्या संदेशात त्याने पाकिस्तानवरही टीका केल्याचे दिसत आहे.

दरम्यान, त्याने दहशतवाद्यांना जिहादी असे संबोधले आहे. तसेच पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांच्या तावडीतून काश्मीरमध्ये लढणाऱ्या जिहादींनी मुक्त केले पाहिजे. तसेच त्यांनी आपली धोरणे शारीया कायद्यानुसार तयार केली पाहिजे, असेही त्याने संदेशात म्हटले आहे. तसेच दहशतवादाला समर्थन देत त्याला प्रोत्साहन त्याने दिल्याचे समोर आले आहे. अल कायदा दहशतवाद्यांचा एक समूह भारतीय सुरक्षा यंत्रणांच्याविरोधात लढण्यासाठी तयार करण्याच्या प्रयत्न करत आहे. दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्थेचे आपल्या विचारांमुळे नुकसान होईल आणि उपकरणे, सैनिकांच्या कमतरतेचा सामना भारताला करावा लागेल, असेही त्याने आपल्या संदेशात म्हटले आहे.

Leave a Comment