मुंबई महानगरपालिकेची अनधिकृत पार्किंग करणाऱ्या 241 वाहनांवर कारवाई


मुंबई : बृह्नमुंबई महानगरपालिकेने मुंबईची वाहतूक सुरळीत व्हावी या दृष्टीने अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यानुसार 27 वाहनतळांच्या लगत 500 मीटर परिसरात आढळून येणाऱ्या अनधिकृत पार्किंगवर पालिकेने रविवारी 7 जुलैपासून धडक कारवाई केली आहे. यानुसार 243 वाहनांवर गेल्या 3 दिवसात कारवाई करण्यात आली असून 8 लाखाहून अधिक दंड कारवाई करण्यात आलेल्या वाहनांकडून वसूल केला आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर आणि रस्त्यांजवळ अनधिकृत ‘पार्किंग’ होत असते. पालिकेने हे लक्षात घेता ‘नो पार्किंग झोन’मध्ये वाहन चालकांना तब्बल 10 हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार रविवारी 7 जुलैपासून निर्णयाची अमंलबजावणी करण्यात आली.

याबाबत पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 243 वाहनांवर रविवार 7 जुलैपासून काल मंगळवारी 9 जुलैपर्यंत कारवाई करण्यात आली आहे. पालिकेने या वाहनांकडून 8 लाख 69 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे. 243 वाहनांमध्ये 133 चारचाकी, 101 दुचाकी, 9 तीन चाकी वाहनांचा या कारवाईत समावेश आहे.

पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, महापालिका क्षेत्रातील 27 वाहनतळांलगतच्या 500 मीटर परिसरात आढळून येणाऱ्या अनधिकृत पार्किंगवर कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान उचलण्यात आलेल्या वाहनासाठी लावण्यात आलेला दंड व विलंब आकाराचा या रकमेत समावेश आहे. विभागातील विकास कामांसाठी ही रक्कम खर्च केली जाणार आहे.

Leave a Comment