मुसळधार पावसामुळे वॉशिंग्टनचे झाले मुंबईसारखे हाल


वॉशिंग्टन: अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भातील वृत्त सीएनएन या वृत्तसंस्थेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार याठिकाणी अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. अनेक वाहने या पाण्यात पूर्णपणे बुडाली आहेत. अमेरिकेतील राष्ट्रीय हवामान सेवेने या पार्श्वभूमीवर या भागात आपातकालीन परिस्थिती जाहीर केली आहे.

पोटोमॅक नदीला गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठा पूर आला आहे. अनेकजण या पुरात अडकून पडले आहेत. स्थानिक प्रशासनाकडून सध्या रस्त्यावरील गाड्यांमध्ये आणि नदीपात्रालगत असलेल्या घरांमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. पुराचा सर्वाधिक फटका ग्रेट फॉल्स, व्हर्जिनिया, मेरीलँड, अलेक्झांड्रिया व्हीए आणि कोलंबियाच्या काही परिसराला बसला आहे. याशिवाय, वादळी वाऱ्यांमुळे या भागातील हवाईसेवाही जवळपास ठप्प झाली आहे.

मुसळधार पावसामुळे पाण्याचा निचरा होणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे शहरी भागातील लहान खाड्या आणि ओढ्यांना पूर आला आहे. परिणामी सखल भागांमधील रस्त्यांवर पाणी साचल्याचे वृत्तही सीएनएनने दिले आहे. अमेरिकेतील पूर परिस्थितीदरम्यान अनेक लोकांचे गाडीत अडकून मृत्यू होतात. त्यामुळे रस्ता पाण्याखाली गेलेल्या परिसरात वाहने घेऊन जाऊ नये, असा सल्लाही राष्ट्रीय हवामान सेवेने दिला आहे.

Leave a Comment