सीसीटीव्हीने पाडले उघडे रेस्टॉरंटमध्ये आलेल्या ग्राहकाचे पितळ


आयर्लंडमधील न्यूब्रीज शहरामध्ये ‘जज रॉय बीन्स अँड स्टेक हाऊस’ या ठिकाणी असेलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे या रेस्टॉरंटमध्ये भोजनासाठी आलेल्या एका महिला ग्राहकाचे पितळ उघडे पडले. या महिलेने भोजन घेत असताना अचानक घश्यामध्ये काहीतरी अडकल्याने श्वासोच्छवास करण्यास त्रास होत असल्याचे भासवीत आपल्या तोंडातून काचेचा मोठा तुकडा बाहेर काढून, अन्नाद्वारे हा तुकडा घश्यामध्ये गेला असल्याचे म्हटले होते. मात्र रेस्टॉरंटमध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या महिलेने स्वतःच्या खिश्यातून काचेचा तुकडा काढून, आपल्याकडे कोणाचे लक्ष नाही असे पाहून हा तुकडा आपल्या तोंडात टाकला आणि श्वास कोंडल्याचे भासवत रेस्टॉरंटमधील अन्नामध्ये काचेचा तुकडा निघाल्याचा आकांडतांडव केल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेचे सविस्तर वृत्त ‘आयरिश मिरर’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले असून, संबंधित फुटेजही सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

या महिलेने अन्नामध्ये काच निघाल्याचे सांगून रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाकडे तक्रार केली. रेस्टॉरंटनेही तिला नुकसानभरपाई देण्याची त्वरित तयारी दर्शविली. रेस्टॉरंटकडून पैसे उकळण्याचा या महिलेचा प्रयत्न सफल ठरणारच होता, मात्र सीसीटीव्हीवरील फुटेज द्वारे काचेचे तुकडे महिलेने आपल्या खिशातून काढून तोंडामध्ये घातल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रेस्टॉरंट व्यवस्थापनाच्या वतीने पोलिसांकडे तक्रार केली गेली. पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित फुटेज पाहिल्यानंतर महिला ग्राहकाला अटक केली असल्याचे समजते. मात्र जर रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या घटनेचे सीसीटीव्हीचे फुटेज सापडले नसते, तर या महिला ग्राहकाला नुकसानभरपाई द्यावी लागलीच असती, शिवाय रेस्टॉरंटचे नावही खराब झाले असते. संबंधित घटनेचे फुटेज सोशल मिडियावर ‘व्हिंटनर्स फेडरेशन ऑफ आयर्लंड’च्या वतीने शेअर करण्यात आले असून याला आतापर्यंत हजारो ‘व्ह्यू’ मिळाले आहेत.

आजकाल अन्नामध्ये काही ना काही घातक पदार्थ सापडल्याचे भासवून संबंधित रेस्टॉरंट कडून नुकसान भरपाईच्या रूपात भरपूर पैशांची मागणी करणे, इंश्युरंस क्लेम करणे इत्यादी प्रकार वारंवार घडत आहेत. अनेकदा बदनामीच्या भीतीने रेस्टॉरंट्स देखील ग्राहकांना नुकसान भरपाई देण्यास तयार होत असतात. अश्या वेळी सीसीटीव्ही फुटेज कसे मह्त्वाचे ठरू शकते हे आयर्लंड मधील रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या घटनेने दाखवून दिले आहे. रेस्टॉरंटमधील अन्नामध्ये काहीतरी घातक वस्तू सापडली असे भासवून रेस्टॉरंटकडून नुकसानभरपाई मागण्याचे प्रकार यापूर्वीही अनेकदा घडले आहेत. काही दिवसांपूर्वी चीनमधील एका माणसाने अन्नामध्ये मेलेला उंदीर सापडल्याचे भासवून रेस्टॉरंटकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला, पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये याच माणसाने स्वतःच मेलेला उंदीर आपल्या भोजनाच्या प्लेटमध्ये ठेवल्याचे स्पष्ट झाल्यामुळे या ग्राहकाचे पितळ उघडे पडले होते.

Leave a Comment