अरे देवा…! या 10 वर्षीय मुलीच्या डोळ्यातून निघत आहेत चक्क खडे!


जळगाव – जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावात एका 10 वर्षीय मुलीच्या डोळ्यातून हरभऱ्याच्या आकाराचे खडे निघत असल्याचा आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. दरम्यान स्थानिक लोक हा दैवी चमत्कार असल्याचे बोलत आहेत. पण असा प्रकार शक्य नाही. ही केवळ अंधश्रद्धा आहे, असे नेत्रतज्ज्ञांनी सांगितल्याने या घटनेचे गूढ कायम आहे.

त्या मुलीचे नाव श्रद्धा राधेश्याम पाटील असे असून तिच्या डोळ्यातून गेल्या दोन दिवसात 20 ते 22 खडे निघाले आहेत, असा दावा तिच्या आई-वडिलांनी केला. श्रद्धा ही दोन दिवसांपूर्वी घराशेजारी खेळत होती. तिच्या डोळ्यातून तेव्हा खडे निघाले. तिच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनी तिच्या आई-वडिलांना ही बाब सांगितली. पण, त्यांचा त्यावर विश्वास बसला नाही. पण, श्रद्धाला त्रास होऊ लागल्याने राधेश्याम पाटील यांनी तिला डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या दवाखान्यात नेले. तिच्या डोळ्यांची डॉ. पाटील यांनी तपासणी केली. तिचा डोळा काही वेळाने दाबला असता, एक खडा डोळ्यातून तळ हातावर पडला, असे डॉ. चंद्रकांत पाटील म्हणाले. पाटील यांनी त्यानंतर श्रद्धाला नेत्रतज्ज्ञाकडे नेण्याचा सल्ला दिला. मग तिला चाळीसगाव येथील नेत्र रोगतज्ज्ञ डॉ. अमित महाजन यांच्याकडे नेण्यात आले. श्रद्धाच्या डोळ्यांची त्यांनी तपासणी केली. तिच्या डोळ्यांना संसर्ग झाला असल्याचे सांगून औषध दिले. त्यांनी डोळ्यातून अशा प्रकारे खडे निघू शकत नाहीत, असे सांगितले.

Leave a Comment