जेफ बेझोस आणि मॅकेन्झीच्या घटस्फोटाला न्यायालयाची मंजूरी


सॅनफ्रान्सिस्को – अॅमेझॉनचा सहसंस्थापक जेफ बेझोसची पूर्वाश्रमीची पत्नी मॅकेन्झी हिला घटस्फोट झाल्यानंतर तब्बल २ लाख ६६ हजार कोटी मिळाले आहेत. त्यामुळे ती एकाच क्षणात जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत महिला ठरली आहे. दोघांच्या घटस्फोटाला न्यायालयाने शुक्रवारी मंजूरी दिली आहे.

शुक्रवारी बेझोस दाम्पत्याचे घटस्फोटाचे प्रकरण वॉशिंग्टनमधील न्यायालयाने मंजूर केले आहे. अॅमेझॉनचे ४ टक्के शेअर हे यामध्ये मॅकेन्झीला देण्याची तडजोड करण्यात आली आहे. ३८ अब्ज डॉलर याची किंमत आहे.

अॅमेझॉनचे ११४.८ अब्ज डॉलरचे शेअर जेफ यांच्याकडे आहेत. तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. एप्रिलमध्ये बेझोस दाम्पत्याने घटस्फोटाचा अंतिम निर्णय घेतला होता. एखाद्या पत्नीला घटस्फोटानंतर मिळणारी ही रक्कम आजपर्यंतची जगात सर्वात अधिक आहे.

४९ वर्षांच्या मॅकेन्झी या लेखिका आहेत. यापूर्वीच मिळणाऱ्या रक्कमेतील अर्धी रक्कम त्यांनी समाजसेवेसाठी देणार असल्याचे जाहीर केले आहे. ही रक्कम जगप्रसिद्ध गुंतवणुकदार वॉरेन बफेट यांच्या गिव्हिंग प्लेजला देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. दान करण्यासाठी भरपूर संपत्ती असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

Loading RSS Feed

Leave a Comment