‘जय श्री राम’चा नारा बंगाली संस्कृतीशी संबंधित नाही – अमर्त्य सेन


नवी दिल्ली – जाधवपूर विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलताना नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध अर्थशास्त्री अमर्त्य सेन यांनी बंगाली संस्कृतीशी ‘जय श्री राम’चा नारा संबंधित नसून आता या नाऱ्याचा वापर लोकांना मारहाण करण्यासाठी होत असल्याचे वक्तव्य केले आहे. बंगाली लोकांच्या आयुष्यात माँ दुर्गा सर्वव्याप्त असल्याचे म्हणत त्यांनी नाव न घेता भाजपवर निशाणा साधला आहे.

बंगाली संस्कृतीशी ‘जय श्री राम’चा नारा संबंधित नाही. राम नवमी सुद्धा आता लोकप्रिय होत आहे. याबद्दल यापूर्वी कधी ऐकले नव्हते. माझ्या चार वर्षाच्या नातीला मी तुझी आवडती देवता कुठली? असा प्रश्न केला. त्यावर तिने माँ दुर्गा असे उत्तर दिले. आपल्या आयुष्यात माँ दुर्गा सर्वव्याप्त असल्याचे अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे.

लोकांना मारहाण करण्यासाठी ‘जय श्री राम’ या नाऱ्याचा उपयोग केला जात असल्याचे माझे वैयक्तिक मत आहे. जय श्री रामचा नारा देण्यासाठी देशाच्या काही भागांमध्ये लोकांवर सक्ती करण्यात आल्याचे प्रकार घडले असून नकार देणाऱ्यांना मारहाण करण्यात आली असल्याच्या पार्श्वभूमीवर अमर्त्य सेन यांनी हे वक्तव्य केले आहे.

Leave a Comment