सत्ताधाऱ्यांचा विरोध करण्यासाठी या महिलेने चक्क शिवून घेतले तोंड


अनेक देशातील सत्ताधारी सरकारच्या विरोधात आंदोलन करताना लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. कोणी आंदोलक रस्ता रोको, तर कोणी काळे झेंडे, तसेच उपोषण आणि मोर्चा काढून सरकारचा विरोध करतात. पण यापलिकडचे चित्र अफगाणिस्तानमध्ये पाहायला मिळाले आहे. सरकारचा विरोध करण्यासाठी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये पाच महिलांनी चक्क आपले तोंठ शिवून घेतले आहे.

यासंदर्भातील वृत्त नवभारत टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार या महिलांनी गेल्यावर्षी निवडणुकांमध्ये झालेल्या कथित गोंधळाबाबत राष्ट्रपती भवनासमोर आपले तोंड शिवून आपला विरोध नोंदवला. निवडणुकींमध्ये या पाचही महिला पराभूत झाल्या होत्या. याबाबत महिलांचे असे म्हणणे आहे की, या निवडणुकांमध्ये गोंधळ झाला असून त्याविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. या महिलांनी एका महिला डॉक्टरकडून आपले ओठ शिवून घेतले.

गेल्या ३ महिन्यांपासून या महिला सरकार विरोधात प्रदर्शन करत आहेत. त्यांचे म्हणने आहे की, या निवडणुकीत जे विजयी झाले आहेत, ते पैशांच्या जोरावर संसदेत पोहोचले. आणखी ९ महिलांनी त्यांच्यासोबतच उपोषण सुरू केले आहे. या महिलांची मागणी आहे की, निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळाबाबत एक कमिटी बसवली जावी आणि चौकशी केली जावी.

Leave a Comment