महानायकांचा हा लूक साकारण्यासाठी लागतात एवढे तास


आपल्या अभिनयासोबतच चित्रपटातील आपल्या वेगवेगळ्या लूक्समुळेही बॉलीवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन लोकप्रिय आहेत. त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये आपल्या लूक्सवर प्रयोग केले आहेत. यातील पा सारख्या चित्रपटांमधील लूकमध्ये तर त्यांना ओळखणेही कठीण झाले होते. आता असाच काहीसा वेगळा लूक त्यांच्या आगामी ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटातही पाहायला मिळणार आहे.


याच चित्रपटातील त्यांचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर आता अमिताभ यांनी हा लूक साकारण्यासाठी किती वेळ लागतो, हे सांगत मेकअप करतानाचा फोटो शेअर केला आहे. गुलाबो सिताबोची प्रत्येक दिवशी शूटींग करण्यासाठी तब्बल ३ तास अमिताभ यांना आपल्या मेकअपसाठी द्यावे लागतात, असे अमिताभ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सांगितले आहे.

दरम्यान अमिताभ यांच्याव्यतिरिक्त ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुरानादेखील झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत सरकार हे करत आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी २४ एप्रिलला पाहायला मिळणार असून याशिवाय अमिताभ ‘चेहरे’ चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Leave a Comment