जिओची फेसबुकच्या सहकार्याने डिजीटल उडान मोहिम


नवी दिल्ली – रिलायंस जिओने देशात इंटरनेट साक्षरतेला गती देण्यासाठी ‘डिजीटल उडान’ ही नवीन मोहीम सुरू केली असून फेसबुकच्या सहकार्याने रिलायन्स जिओने डिजीटल उडान ही मोहिम सुरू केली असून दर शनिवारी जिओ युजर्सना या मोहिमेअंतर्गत सुरक्षित इंटरनेट वापराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिओ फोनचे फीचर्स, विविध अॅप्सचा वापर कसा करावा याबाबत यामध्ये टिप्स दिल्या जातील. कंपनीकडून नुकतीच या मोहिमेबाबतची माहिती दिली आहे.

भारतात दिवसेंदिवस स्मार्टफोनचे युजर्स आणि इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या वाढत असून इंटरनेटचा वापर करणाऱ्यांसाठी बऱ्याच अडचणी येत असतात आणि भारतीय भाषांमध्ये याबाबतचे योग्य मार्गदर्शन उपलब्ध नसल्यामुळे युजर्सना अडचणीचा सामना करावा लागतो. रिलायन्स जिओने ही बाब लक्षात घेऊन फेसबुकच्या सहकार्याने डिजीटल उडान या नावाने नवीन इंटरनेट साक्षरता मोहीम सुरू केली आहे.

युजर्सना जिओच्या या मोहिमेअंतर्गत ऑडिओ आणि व्हिडिओ माध्यमातून 10 भाषांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल. जिओने यासाठी फेसबुकसोबत भागीदारी केली आहे. ही मोहिम पहिल्या टप्प्यामध्ये देशातील 13 राज्यांमध्ये 200 ठिकाणी सुरू केली जाईल, त्यानंतर ही मोहिम येत्या काही महिन्यात सात हजार ठिकाणी सुरू होईल. इंटरनेट साक्षरतेला यात अतिशय मनोरंजनात्मक पध्दतीत सादर करण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

डिजिटल लाइफचा उत्तम अनुभव भारतीय ग्राहकांना मिळावा यासाठी जिओ नेहमीच प्रयत्नशील आहे. देशातील प्रत्येक शहरात आणि गावात 100% डिजिटल साक्षरतेसाठी ही मोहिम घेऊन जाण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती रिलायंस जिओचे संचालक आकाश अंबानी यांनी दिली.

Leave a Comment