राहुल गांधींच्या धाडसी निर्णयाचे प्रियंकांकडून समर्थन


नवी दिल्ली – चार पानी राजीनामा लिहून राहुल गांधी यांनी पक्षाकडे सोपवला. राहुल गांधी यांनी यामध्ये त्यांची संपूर्ण भूमिका मांडली आहे. काँग्रेस नेत्या आणि राहुल गांधी यांची बहिण प्रियंका गांधी यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. प्रियंका गांधी यांनी ट्विट करून असा निर्णय घ्यायला धाडस लागते असे म्हटले आहे. तसेच या निर्णयाला माझा पाठिंबा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


आता काँग्रेस अध्यक्षपदावर मी नसून पक्षाच्या कार्यकारी समितीने तातडीने बैठक बोलवून नव्या अध्यक्षाची निवड करावी असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. आधीच राजीनामा मी दिला असून नव्या अध्यक्षाची कार्यकारी समितीने निवड करावी असे राहुल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची वक्तव्ये ज्यानंतर समोर येत आहेत. आता राहुल गांधी यांचा निर्णय धाडसी असल्याचे म्हणत प्रियंका गांधी यांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

राहुल गांधी लोकसभा निवडणुकीतल्या दारूण पराभवानंतर अत्यंत अस्वस्थ झाले होते. कार्यकारिणीच्या बैठकीतच त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांचा हा प्रस्ताव अनेक ज्येष्ठ नेत्यांनी स्वीकारला नाही. तरीही राहुल गांधी यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी घेत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला.

Leave a Comment