आमदार नितेश राणे यांची उप अभियंत्यावर चिखलफेक


मुंबई – आमदार नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा रोष उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना सहन करावा लागला. मुंबई गोवा महामार्गावर खड्डे पडल्याने आणि चिखल उडत असल्याने आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरच्या पुलाला बांधले आणि त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या.

उप अभियंत्याला नितेश राणे यांनी संतापलेल्या स्वरातच खड्ड्यांबद्दल जाब विचारला. तुम्हाला लोकांच्या अंगावर चिखल उडतो तो दिसत नाही का? तुम्हाला रस्त्यावर पडलेले खड्डे दिसत नाही का? चिखल उडाल्यावर कसे वाटते ते तुम्हीच बघा असे म्हणत कार्यकर्त्यांना त्यांनी चिखल ओतायचा आदेश दिला. दोन-चार कार्यकर्त्यांनी त्यानंतर तातडीने उप अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या डोक्यावर चिखलाने भरलेल्या बादल्या रिकाम्या केल्या.

गडनदी पुलाला प्रकाश शेडेकर यांना बांधूनही ठेवले. जो त्रास सामान्य माणसांना सहन करावा लागतो, तो तुम्हीपण आज सहन करा असे म्हणत त्यांच्यावर चिखलफेक करण्यात आली. तुम्हाला कणकवली तुंबवण्याचा अधिकार कुणी दिला? असाही प्रश्न नितेश राणेंनी विचारला. प्रकाश शेडेकर यांना गडनदी पूल ते जाणवली पूलापर्यंत नितेश राणे आणि स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी पायी चालत नेले आणि वस्तुस्थिती दाखवली.

Leave a Comment