अद्यापही उलगडलेली नाहीत ही रहस्ये


आजचा काळ हा विज्ञानाच्या प्रगतीचा काळ मानला जातो. आजच्या काळामध्ये मानवाला परिचित नाहीत, किंवा शास्त्राने सिद्ध झाल्या नाहीत अश्या गोष्टी सहसा आढळत नसल्या, तरी काही रहस्यांची उकल मात्र आजतागायत होऊ शकलेली नाही. आज अश्याच काही रहस्यांच्या बद्दल जाणून घेऊ या. केन्या देशातील रूडॉल्फ लेकच्या जवळ असणाऱ्या बेटाला ‘नो रिटर्न’ आयलंड या नावाने ओळखले जाते. हे बेट आताच्या काळामध्ये अगदी निर्मनुष्य असले, तरी एके काळी या बेटावर मानवी वास्तव्य असल्याचे म्हटले जाते. मात्र हे लोक हे बेट सोडून कुठे, गेले, कधी गेले हे मात्र आजतागायत न उलगडलेले रहस्य आहे. आताच्या काळामध्ये ज्याने या बेटावर जाण्याचा प्रयत्न केला, ते पुनश्च कधी परतलेच नसल्याने या बेटाला ‘नो रिटर्न’ आयलंड म्हटले जाते.

चीनमध्ये राहणारे ली चिंग युएन जेव्हा मरण पावले, तेव्हा त्यांचे वय तब्बल २५६ वर्षांचे होते. ली चिंग हे स्वतः चीनी औषधशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी वयाची शंभरी पार केल्यानंतर चीन सरकारच्या वतीने त्यांचा सन्मानही करण्यात आला होता. ली चिंग त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय सक्रीय होते. आपल्या आयुष्यभरामध्ये त्यांनी चोवीस वेळा विवाह केला. इतकेच नव्हे, तर वयाच्या दोनशेव्या वर्षी देखील ली चिंग चीनमधील अनेक विद्यापीठांमध्ये चायनीज मेडिसिनवर भाषणे देण्यास जात असल्याचे म्हटले जाते. मात्र ली चिंग यांच्या दिघायुष्याचे रहस्य नेमके होते तरी काय, हे आजवर कोणीही सांगू शकलेले नाही.

कॉस्टा रिका येथे असलेल्या ‘स्टोन स्फियर्स’ चा शोध १९३०च्या दशकामध्ये लागला होता. गोलाकार, एखद्या विशालकाय चेंडूप्रमाणे दिसणाऱ्या या दगडांना त्यांचा आकार अर्थातच मानवानेच दिलेला आहे. स्थानिक भाषेमध्ये या विशालकाय दगडी चेंडूंना ‘लास बोलास’ म्हटले जाते. या ठिकाणी एके काळी अस्तित्वात असलेल्या ‘दिकीस’ संस्कृतीकालीन हे दगड असावेत असा अंदाज पुरातत्ववेत्त्यांनी व्यक्त एकला असला, तरी या दगडी चेंडूंच्या विषयी जास्त माहिती, किंवा ते नेमके कोणत्या कारणासाठी वापरले जात होते हे ज्ञान अजूनही प्रकाशात आलेले नाही. इंग्लंडमधील विल्टशर भागातील मिल्क हिलच्या परिसरामध्ये असलेल्या शेतांमध्ये २००१ साली अचानक ७८० फुट क्षेत्रात विस्तारलेली ‘क्रॉप सर्कल्स’ अवतरली. आकाशातून हे दृश्य शेतामध्ये भलीमोठी रांगोळी काढल्या प्रमाणे दिसत असून, ४०९ लहान मोठ्या वर्तुळांचे मिळून असे हे क्रॉप सर्कल बनले होते. हे क्रॉप सर्कल रातोरात अवतरले असून, आजवर अशी अनेक क्रॉप सर्कल्स ब्रिटनच्या निरनिराळ्या प्रांतांमध्ये सापडली आहेत. ही अवाढव्य क्रॉप सर्कल्स अवघ्या एका रात्रीत तयार होत असल्याने ही सर्कल्स बहुधा परग्रहावरील जीव पृथ्वीवर अवतरून तयार करीत असावेत असे ही म्हटले गेले आहे. मात्र ही सर्कल्स नेमकी तयार होतात कशी आणि ही कोण तयार करते हे आजवर न उलगडलेले रहस्य आहे.

स्कॉटलंड येथील दोनशे मीटर खोलीच्या ‘लॉख नेस’ सरोवरामध्ये एक विचित्र प्राणी पाहिला गेला आहे. या प्राण्याला ‘लॉख नेस मॉन्स्टर’ किंवा ‘नेसी’ या नावाने संबोधण्यात येते. जिराफाप्रमाणे लांबलचक मान आणि बैलाच्या पाठीवर असते तसे कुबड असणारा हा प्राणी अनेक दशकांपूर्वी पहिल्यांदा या सरोवरामध्ये पाहिला गेला होता. मात्र हा प्राणी या सरोवरामध्ये कुठून आला हे रहस्य मात्र कायम आहे. या प्राण्यावर आधारित अनेक माहितीपट, चित्रपट बनविण्यात आले असले, तरी या प्राण्याबद्द्लची सविस्तर माहिती आजवर कोणीच देऊ शकलेले नाही. काहींच्या मते हा प्राणी काल्पनिक आहे, तर काहींच्या मते हा या सरोवरामध्ये गेल्या अनेक दशकांपासून आहे. अनेक मासेमारांनी, शास्त्रज्ञांनी आणि हौशी मंडळींनी सरोवराच्या पाण्यामध्ये उतरून या प्राण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणालाच यश आले नाही आणि या प्राण्याबाद्दल्चे रहस्य कधी उलगडलेच नाही.

Leave a Comment