भाजप महिला नेत्याचे मुस्लिम महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य


नवी दिल्ली: हिंदूंनी मुस्लीम महिलांवर घरात घुसून बलात्कार करावे, असे चिथावणीखोर वक्तव्य उत्तर प्रदेशमधील भाजपच्या महिला मोर्चाच्या नेत्या सुनिता सिंह गौड यांनी केले आहे. हे वक्तव्य रामकोला येथील या भाजप पदाधिकाऱ्याने केल्यानंतर देशभरात याचे पडसाद उमटत आहेत.


फेसबुकवरील एका पोस्टवर कमेंट करत गौड यांनी लिहिले होते, एकच यावर उपाय आहे. मुस्लीमांच्या बहिण आणि आईवर 10 हिंदू भावांनी एकत्रित सार्वजनिकपणे रस्त्यावर बलात्कार करावा. त्यांना त्यानंतर कापून बाजाराच्या मधोमध खांबाला लटकवा. दगडाचे उत्तर दगडानेच द्यावे लागेल.


यावर पत्रकार दिपाली त्रिवेदी यांनी आक्षेप घेत अशा प्रकारच्या द्वेषपूर्ण प्रतिक्रियेचा निषेध केला. तसेच सत्तेचा उपयोग अशा विकृत विचारधारेचा प्रसार करण्यासाठी होत असल्याचाही आरोप केला. बॉलिवुड अभिनेत्री स्वरा भास्करने देखील यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. स्वरा म्हणाली, ही बातमी खरी वाटते. कारण फेसबुकवर संबंधित महिलेने आपली सेटिंग बदलली असल्यामुळे सार्वजनिकपणे ही प्रतिक्रिया पाहता येत नाही. स्वतःला ही महिला भाजपच्या महिला मोर्चाचा अध्यक्ष म्हणवत आहे, पण, तिच महिला मोर्चाची अध्यक्ष महिलांवरच सामुहिक बलात्काराची भाषा करत आहे. आपल्या ट्विटमध्ये स्वराने फेसबुकलाही टॅग करत संबंधित महिला सार्वजनिकपणे बलात्कारासाठी चिथावणी देत असल्याचे लक्षात आणून दिले.


भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्वराच्या या ट्विटला उत्तर देताना संबंधित महिला भाजप महिला मोर्चाची अध्यक्ष नसल्याचा युक्तीवाद केला. तसेच स्वरा भास्करवरच अफवा पसवत असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, महिला भाजप महिला मोर्चाची ती अध्यक्ष आहे हा फक्त तुमचा दावा आहे. सध्या त्या पदावर मी आहे. भाजपवर किंवा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष पदावर टीका करण्याआधी तथ्य तपासून घ्या. यामुळे अफवा पसरवण्याच्या तुमच्या सवयीला आळा बसेल, अशी आशा आहे.


रहाटकर यांनी पत्रकार त्रिवेदी यांच्या ट्विटला उत्तर देताना त्या पदाधिकाऱ्याला निलंबित केल्याचे सांगितले. रहाटकर म्हणाल्या, अशी कोणतीही घृणास्पद प्रतिक्रिया सहन केली जाणार नाही. सुनिता सिंह गौड यांना निलंबित करण्यात आले असून रहाटकर यांनी आपल्या ट्विटसोबत त्यासंबंधित पत्राचाही फोटो टाकला. याप्रमाणे 27 जूनला गौड यांना पदावरुन हटवण्यात आले.

मुस्लीम महिलांवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी भाजप नेत्या सुनिता सिंह गौड यांनी सोशल मीडियावर भडकावल्यानंतर सर्वच स्तरातून याचा निषेध होत आहे. अगदी महाराष्ट्राच्या विधानसभेतही याचे पडसाद उमटले आहेत. गौड यांची ही प्रतिक्रिया फेसबुकवरुन हटवण्यात आली आहे. मात्र, या प्रतिक्रियेचे स्क्रिनशॉट सर्वत्र व्हायरल होत आहेत.

Leave a Comment